डोंबिवलीतील अनंतम रिजेन्सी गृहसंकुलात तीव्र पाणी टंचाई ?

Spread the love

ठाणे : प्रतिनिधी (निलेश घाग) डोंबिवली येथील शीळ रस्त्यावरील गोळवली-दावडी गाव हद्दीतील सुमारे २५ हजाराहून अधिक लोकवस्ती असलेल्या रिजेन्सी अनंतम, रिजेन्सी गृहसंकुलात गेल्या आठवड्यापासून पुन्हा तीव्र पाणी टंचाईला सुरूवात झाली आहे. एमआयडीसी, कल्याण डोंबिवली पालिका स्तरावर हा पाणी टंचाईचा विषय मार्गी लागत नसल्याने संतप्त झालेल्या रहिवाशांनी याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून या महत्वपूर्ण विषयात लक्ष घालण्याची मागणी केली आहे

२७ गावांमध्ये दोन वर्षापासून टँकर समुहाच गट अधिक सक्रिय झाला आहे. दिवसा-रात्रीच्या वेळेत २७ गाव, डोंबिवली हद्दीत पाणी पुरवठा करणारे सुमारे ४० पाणी पुरवठा करणारे टँकर शहराच्या विविध भागात फिरून अनेक गृहसंकुलांना पाणी पुरवठा करत आहेत. या टँकर समुहाच्या या भागातील वरचढपणामुळे ही कृत्रीम पाणी टंचाई २७ गाव हद्दीत निर्माण करण्यात येत असल्याची जोरदार चर्चा या भागात आहे. गेल्या आठवड्यात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रात्रीच्या वेळेत २७ गाव हद्दीतील पाणी चोरी केंद्रावर छापा मारुन पाणी चोरी उघड केली होती. या घटनेला सात दिवस उलटत नाहीत, तोच पुन्हा शीळ रस्त्यावरील रिजन्सी गृहसंकुल, रिजेन्सी अनंतम या संकुलांमध्ये पाणी टंचाई सुरू झाली आहे. असाच प्रश्न याच भागातील देशमुख होम्स भागात नियमित उपस्थित होतो.

रिजेन्सी अनंतम संकुल व्यवस्थापनाने मुख्यमंत्री शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, आमच्या संकुलाला तीन दशलक्ष लीटर दररोज पाणी पुरवठा एमआयडीसीकडून होतो. विकासकाने तसा प्रस्ताव मंजूर करुन घेतला आहे. सुरुवातीला हे पाणी आम्हाला पुरेसे होते. गेल्या काही महिन्यांपासून आमच्या संकुलात पुरेशा दाबाने पाणी होत नाही. रहिवाशांचे पाण्यासाठी हाल होतात. आमच्या एकित्रत पाणी पुरवठ्याच्या टाकीतून कल्याण डोंबिवली पालिका पाणी उचलून परिसराला पाणी पुरवठा करते. ही सोय विकासकाने तीन महिन्यासाठी पालिकेला उपलब्ध करुन दिली होती. ती पालिकेने अद्याप बंद केलेली नाही. पालिकेने आमच्या संकुलातून पाणी उचलणे बंद करावे, असे वारंवार कळवुनही पालिका त्याकडे दुर्लक्ष करते, असे रहिवाशांनी सांगितले.

रिजेन्सी संकुलात टंचाई

गोळवली येथील रिजेन्सी संकुलात सुमारे बाराशे घरे, २६ इमारती, ५६ बंगले आहेत. या संकुलात सहा हजाराहून अधिक वस्ती आहे. या संकुलात गेल्या वर्षापासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. गेल्या काही दिवसापूर्वी संकुलाचा पाणी पुरवठा सुरळीत झाला होता. होळीपासून पुन्हा संकुलात पाणी टंचाई सुरू झाली आहे. या सततच्या पाणी टंचाईने रहिवासी हैराण झाले आहेत.

अनेक वेळा मोठ्या गृहसंकुलांना पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहनी भागात काही समाजकंटक दगड, माती, सिमेंट माती भरुन ठेवतात. सोसायटीला होणारा पाणी पुरवठा अपुरा आणि बंद राहील अशी व्यवस्था करत असल्याचे निदर्शनास आले होते,

बेकायदा बांधकामांना मुबलक पाणी असते, मग पिण्यास पाणी का मिळत नाही, असा रहिवाशांचा प्रश्न आहे. कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनात खमक्या अधिकारी नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली असल्याची चर्चा डोंबिवली शहर, गावांमध्ये आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी जणशक्तीचा दबावर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा मराठी न्यूज वेबसाइट जनशक्तीचा दबावर.
भारत सरकार मान्यताप्राप्त वृत्तपत्र RNINO.MAHMAR2014/59698
दबाव जनशक्तीचा ……निर्धार लोकशाहीच्या सन्मानाचा

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page