
रत्नागिरी- राजापूर तालुक्यातील नाटे बाजारपेठेतील व्यापारी संकुलाला मध्यरात्री १२.३० च्या सुमारास दुकानांना भीषण आग लागली. या भीषण आगीत व्यापारी संकुलातील सात दुकाने जळून खाक झाली.
आगीवर स्थानिक ग्रामस्थ आणि राजापूर अग्निशामक दलाच्या माध्यमातून नियंत्रण मिळवण्यात आले. स्थानिक ग्रामस्थांकडून खाजगी गाड्यांनी पाण्याची व्यवस्था करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. व्यापारी संकुलात असलेल्या दुकान गाळ्यातील सामान आणि दुकान गाळे जळून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार गाळा नंबर एक दिगंबर गिजम यांचे उपहारगृह, गाळा नंबर दोन भीम खंडी यांचे चायनीज सेंटर, गाळा नंबर तीन प्रदीप सहदेव मयेकर यांचे टेलरिंग शॉप, गाळा नंबर चार केदार मधुकर ठाकूर यांचे कापड व प्लास्टिक दुकान, गाळा नंबर पाच प्रसाद सदाशिव पाखरे यांचा फोटो स्टुडिओ, गाळा नंबर सहा निकिता नारायण गोसावी यांचे ब्युटी पार्लर व गाळा नंबर सात नारायण गोसावी यांचे कटलरी साहित्याचे गोडाऊन यांचे साहित्य आणि गाळे पूर्णतः जळून खाक झाले आहेत.

या इमारतीत कोणतेही रहिवासी नसल्याने जीवितहानी टळली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक, नाईट चेकिंग अमलदार व पोलीस ठाण्यातील इतर कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थांनी देखील धाव घेत खाजगी वाहनांद्वारे पाण्याची व्यवस्था करून आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला.
दरम्यान, राजापूर नगरपालिकेच्या अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी पोहोचल्यावर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. अखेर पहाटे चारच्या सुमारास ही आग आटोक्यात आली.
या आगीत किती नुकसान झाले आहे, याबाबत अजून निश्चित माहिती मिळालेली नसून सविस्तर अहवाल प्राप्त झाल्यानंतरच नुकसानाची नेमकी आकडेवारी समजू शकेल.