मुंबई : आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजाराच्या सुरुवातीला दोन्ही निर्देशांकात किरकोळ वाढीसह व्यवहार होत आहे. शुक्रवारी मोठ्या घसरणीनंतर आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजार हिरव्या चिन्हावर उघडला. यूएस फ्युचर्सच्या संकेतामुळे भारतीय बाजाराला पाठिंबा मिळतोय. बाजार उघडताच सेन्सेक्समध्ये १०० हून अधिक अंकांची उसळी पाहायला मिळत असताना निफ्टी १७,००० अंकांच्या अगदी जवळ झेपावला आहे.
आजच्या व्यवहारात बीएसईचा ३० शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स ३९.८० अंक वाढीसह ५७,५६६.९० वर उघडला. तर एनएसईचा ५० शेअर्सचा निर्देशांक निफ्टी ३९.२५ अंक किंवा ०.२३ टक्के वाढून १६,९८४.३० वर खुला झाला.
आज बाजाराच्या सुरुवातीला मुंबई शेअर बाजारचा निर्देशांक सेन्सेक्सच्या ३० पैकी केवळ ११ समभाग सुरुवातीच्या व्यापारात तेजीत व्यवहार करत असताना बँकिंग समभागांतील घसरण बाजाराला खाली खेचत आहे. सेन्सेक्समधील ३० पैकी १९ शेअर्समध्ये घसरण होत असताना याशिवाय निफ्टीच्या ५० पैकी २३ समभागांमध्ये तेजी तर २६ समभागांमध्ये घसरले आहेत.