
मुंबई- प्रसिद्ध भारतीय जेष्ठ शिल्पकार पद्मश्री पुरस्काराने सन्मानित राम वनजी सुतार यांचा वयाच्या 100 व्या वर्षी महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. आज विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत घोषणा केली. राम सुतार यांनी गुजरातच्या स्टॅच्यु ऑफ युनिटी, संसदेतील महात्मा गांधी यांची बसलेली मूर्ती, अमृतसरमधील महाराजा रणजीत सिंह, बिहार विभूती अनुग्रह नारायण सिन्हा, बिहारमध्ये कर्पुरी ठाकूर यासारख्या अनेक मूर्तीचं डिझाइन केलं आहे. २५ लाख रुपये, मानचिन्ह, मानपत्र व शाल असं या पुरस्काराचं स्वरूप असून या माध्यमातून राम सुतार यांच्या कामाचा गौरव केला जाणार आहे. कोकणात उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं कामदेखील राम सुतार यांनाच देण्यात आलं आहे.
राम वनजी सुतार यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1925 रोजी महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील गोंडूर गावात एका सर्वसाधारण कुटुंबात जाला. श्रीराम कृष्ण जोशी यांच्याकडून त्यांना शिल्पकलेची प्रेरणा मिळाली. यानंतर त्यांनी मुंबईतील सर जेजे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये प्रवेश केला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुतार 1959 मध्ये दिल्लीला आले. येथे त्यांनी सूचना आणि प्रसारण मंत्रालयात काम केलं. यानंतर त्यांनी फ्रीलान्स मूर्तिकाराचं काम सुरू केलं. त्यांनी दिल्लीतील लक्ष्मी नगरमध्ये एक स्टुडिओ सुरू केला आणि 1990 मध्ये नोएडात स्थिरावले. 2004 मध्ये त्यांनी स्वत:चा स्टुडिओ स्थापन केला आणि 2006 मध्ये साहिदाबादमध्ये आपली कास्टिंग फॅक्टी स्थापन केली.
आपल्या 60 वर्षांच्या करिअरमध्ये राम सुतार यांनी संसदेच्या आत महात्मा गांधी यांच्या मूर्तीसह अनेक मूर्ती तयार केल्या. त्यांनी तयार केलेलं शिल्प इंग्लंड, फ्रान्स आणि रशिया सारख्या अनेक देशांनाही भेट म्हणून देण्यात आले आहेत. राम सुतार यांनी देशभरात अनेक मोठी शिल्प तयार केली आहेत. सरदार सरोवर येथील सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा हा जगातील सर्वात उंच पुतळाही त्यांनी तयार केला आहे.महात्मा गांधी,छत्रपती शिवाजी महाराज, भगत सिंग,चंबल माता, रणजित सिंग यांसह असख्य शिल्पे त्यांनी बनवली आहेत. महात्मा गांधी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त भारताने अनेक देशांना दिलेले गांधीचे पुतळेही त्यांनीच तयार केले होते. जगभरात तब्बल ३५० हून जास्त गांधींजीच्या पुतळ्यांची निर्मिती त्यांनी केली आहे.