
नाशिक- भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचं निधन झाले आहे. ते ८३ वर्षांचे होते. मागील दीड महिन्यांपासून नाशिक येथील खासगी रुग्णालयात पिचड यांच्यावर उपचार सुरू होते. आज पिचड यांची प्रकृती आणखी खालावली. ब्रेनस्ट्रोक आल्याने पिचड यांना नाशिक येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांची आज शुक्रवारी सायंकाळी ६.३० वा. प्राणज्योत मालवली.
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मधुकर पिचड यांचं नाव आदराने घेतलं जातं. मधुकर पिचड यांनी राष्ट्रवादीत असताना प्रदेशाध्यक्ष पद भुषवलं होतं. त्यानंतर त्यांनी आदिवासी विकास, वन व पर्यावरण मंत्री म्हणून कार्यभार पाहिला होता. 2029 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पिचड यांनी राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पिचड यांनी आपल्या मुलासह प्रवेश केला होता. पण, 2019 च्या निवडणुकीत वैभव पिचड यांचा पराभव झाला. त्यानंतर पिचड यांनी अलीकडेच शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे घरवापसीची चर्चा रंगली होती. पण, अशातच मधुकर पिचड यांची प्रकृती खालावली. ब्रेनस्ट्रोक आल्याने पिचड यांना नाशिक येथील नाईन पल्स रूग्णालयात दाखल केलं होतं. त्यांच्यावर दीड महिन्यांपासून उपचार सुरू होते. आज दुपारी पिचड यांची प्रकृती खालावली. संध्याकाळी त्यांनी रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला. पिचड यांच्या निधनामुळे कुटुंबावर दु: खाचा डोंगर कोसळला आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी स्थापनेनंतर मधुकर पिचड कॉंग्रेस सोडून शरद पवारांसोबत गेले. 1999 साली ते पाचव्यांदा राष्ट्रावादीच्या तिकीटावर आमदार झाले. 2004 साली सहाव्यांदा तर 2009 मध्ये ते सातव्यांदा विधानसभेवर निवडून गेले. मधुकर पिचड यांनी अनेक वर्ष आदिवासी मंत्री म्हणून काम पाहिले. त्यांचे पुत्र वैभव पिचड हे 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून गेले आणि मधुकर पिचड राजकारणापासून काहीसे अलिप्त राहिले. मधुकर पिचड यांचं आदिवासी भागात मोठं काम आहे. ते राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री देखील होते. ते अहमदनगरच्या अकोले विधानसभा मतदारसंघातून 1980 ते 2004 या काळात तब्बल 7 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. ते मार्च 1995 ते जुलै 1999 या काळात विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. त्यांनी 2019 मध्ये मुलगा वैभव पिचड यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपसाठी त्यांनी अहोरात्रदेखील काम केलं होतं.