२९ डिसेंबर रोजी सावंतवाडीत माजी कबड्डीपटूंचा स्नेह मेळावा…
सावंतवाडी/प्रतिनिधी:- एकेकाळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कबड्डी आणि कबड्डी खेळाडू राज्यात सुप्रसिद्ध होते. येथील अनेक दिग्गज कबड्डीपटूंनी आपल्या खेळाने राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवला आहे. मात्र अलीकडच्या काळात हे वैभव कुठेतरी हरपल्याचे जाणवत आहे. म्हणूनच कबड्डीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ कबड्डीपटू यांनी पुढाकार घेतला आहे. येत्या २९ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता सावंतवाडी येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या सभागृहात ज्येष्ठ कबड्डीपटूंचा स्नेह मेळावा आयोजित केला असल्याची माहिती पत्रकार परिषदे दरम्यान जिल्ह्यातील ज्येष्ठ कबड्डीपटू रणजीतसिंह राणे, वसंत जाधव, प्रकाश बिद्रे आदींनी दिली. दरम्यान या कबड्डीपटूंच्या मेळाव्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तमाम कबड्डीपटू व क्रीडाप्रेमी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहनही आयोजकांनी केले आहे. यावेळी ज्येष्ठ कबड्डीपटू रणजितसिंह राणे, वसंत जाधव, अनिल हळदीवे, विनायक पराडकर, प्रकाश बिद्रे, जावेद शेख, शरद शिरोडकर, अॅड. सुरेंद्र बांदेकर, अॅड. नंदन वेंगुर्लेकर, दिलीप मापसेकर, जयराम वायंगणकर, सुभाष भोगण, अजय जाधव आदी उपस्थित होते