3 मे/ मुंबई- रत्नागिरी येथील साप्ताहिक कोकण मिडियाचे संपादक, ज्येष्ठ पत्रकार बाळकृष्ण उर्फ प्रमोद कोनकर यांना आज राजभवन येथे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला.
त्यांच्याबरोबर सकाळचे राजकीय प्रहसन लेखक प्रवीण टोकेकर, दीपक पळसुले, टाइम्स ऑफ इंडियाचे वैभव पुरंदरे, नीलेश खरे, जयंती वागधरे, यू ट्यूबर अनय जोगळेकर, लेखक अंशुल पांडे व समाज माध्यम क्षेत्रातील निनाद पाटील व हृषिकेश मगर या दहा पत्रकारांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाला इस्रायलचे मुंबईतील वाणिज्य दूत कोब्बी शोशानी तसेच माध्यम क्षेत्रातील निमंत्रित उपस्थित होते.
माध्यम क्रांतीच्या आजच्या युगात पारंपरिक माध्यमांपेक्षा प्रभावी मत परिवर्तक, व्हिडीओ ब्लॉगर्स व खासगी चॅनेल्सद्वारे निर्मित बातम्या व विश्लेषण पाहणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अपप्रचारांचा योग्य माहितीच्या आधारे सर्व माध्यमातून मुकाबला करून राष्ट्रहित जपणे आवश्यक आहे. या दृष्टीने माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.
विश्व संवाद केंद्राने २५ व्या वर्षात पदार्पण केले असून आजवर ७४ पत्रकारांना सन्मानित केले असल्याचे अध्यक्ष सुधीर जोगळेकर यांनी सांगितले.