राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे चिपळूणमधील युवा नेतृत्व प्रशांत यादव यांची राज्य सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. शुक्रवारी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे उपस्थितीत मुंबईत झालेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी बैठकीत ही घोषणा करण्यात आली अशी माहिती रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सुरेश तथा बारक्याशेठ बने यांनी दिली.
अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड केल्याने पक्ष फुटीनंतर जिल्ह्यातील शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी रत्नागिरीतील हरहुन्नरी व्यक्तीमत्व असलेल्या सुदेश मयेकर यांचेकडे सोपवले गेले. पण काही दिवसातच त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व संपुष्टात येईल असे चित्र असताना जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सुरेश बने यांचेकडे सोपविण्यात आली. त्यानंतर माजी आम. रमेशभाई कदम यांच्या नेतृत्वाखाली भारतीय काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन प्रशांत यादव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी हाती घेतली.
जिल्हात विषेशता खेड, गुहागर, चिपळूण, संगमेश्वर या तालुक्यात सर्वांना बरोबर घेत मरगळलेल्या पक्षाला युवा नेते प्रशांत यादव यांनी पक्ष बांधणीसाठी पायाला भिंगरी लावत जनसंपर्क वाढवत जनतेच्या अडीअडचणीला मदतीचा हात पुढे करत आपला वेगळा ठसा उमटवत पक्षाला नवसंजीवनी दिली. जनतेच्या समस्या सोडविताना गरज असेल तेव्हा आघाडीतील पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधत कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करुन आपले वेगळे अस्तित्व टिकवत पक्षाला नवसंजीवनी देत पक्ष बांधणीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. याचीच दखल पक्षनेतृत्वाने घेऊन त्यांचेवर राज्य सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल जिल्हा निरीक्षक बबन कनावजे, माजी आम. रमेशभाई कदम, जिल्हाध्यक्ष सुरेश बने, जेष्ठ नेते राजाभाऊ लिमये, कुमार शेट्ये, बशीर मुर्तुजा, नलीनीताई भुवड आदिंनी अभिनंदन केले आहे.