
चिपळूण : तालुक्यातील खेर्डी एमआयडीसी रस्त्यावर अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एका संशयीताला शुक्रवारी रत्नागिरीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून ५ लाख २० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
रत्नागिरीनंतर आता चिपळूणमध्येही अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाईला सुरुवात केली आहे. चिपळूणमध्ये मागील वर्षभरातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. यापूर्वी स्थानिक पोलिसांनी किरकोळ कारवाई केल्या आहेत.
पोलीस निरीक्षक नितीन ढेरे हे आपल्या कर्मचाऱ्यांसह शुक्रवारी चिपळूणमध्ये गस्त घालत होते. चिपळूण शहरापासून जवळ असलेल्या खेर्डी एमआयडीसीतील रस्त्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाची मोहीम सुरू असताना तेथे दीपक रंगला लीलारे (वय. २४, कावीळतळी, चिपळूण) हा तरुण आपल्या दुचाकीवरून एका कापडी पिशवीतून काहीतरी घेऊन जात असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना संशय आला. पोलिसांनी लीलारे याला थांबवले आणि चौकशी केली असता त्याने प्रथम उडवा उडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्याची पिशवी तपासल्यानंतर त्यात एमडी हे अंमली पदार्थ आढळून आले. बाजारात त्याची किंमत ५ लाख २० हजार रुपये इतकी आहे. पोलिसांनी त्याला मुद्देमालासह ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.