
मुंबई :- राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून सुरु होणार आहे. तत्पूर्वीच राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यामुळे या पक्षात व्हीपवरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीला खिंडार पाडले आहे. जास्तीत जास्त आमदार आमच्यासोबत असल्याचा दावा या गटाचे नेते करत आहेत. तर ही फूट बेकायदेशीर असल्याचे शरद पवार गटाचे म्हणणे आहे. इतकेच नाहीतर शपथ घेतलेल्या मंत्र्यांना अपात्र करण्याची मागणी मूळ राष्ट्रवादीकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे करण्यात आली आहे. हा सर्व राजकीय गोंधळ सुरु असताना राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी राष्ट्रीय अध्यक्षपदापासून, प्रदेशाध्यक्ष, युवक प्रदेशाध्यक्ष, महिला अध्यक्ष या पदांसह इतर पदाधिकारी नियुक्त केले आहेत. एका गटाने राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार नियुक्ती केली आहे. तर, प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील कायम आहेत. तर दुसऱ्या गटाने अजित पवार तर प्रदेशाध्यक्षपदी खासदार सुनील तटकरे व इतर पदावर पदाधिकारी नियुक्त करून आमचाच राष्ट्रवादी पक्ष खरा असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाला कळविले आहे. हे सर्व निश्चित करण्यासाठी आयोगाला कायदेशीर अभ्यास करून निर्णय द्यावा लागणार आहे. परंतु, पावसाळी अधिवेशन सुरु होणार असल्यामुळे व्हीप काढण्याचा अधिकार कोणाला असेल, यावरून राष्ट्रवादीमध्ये वाद होणार आहे. तसेच व्हीप कोणाचा लागू होईल, याबाबत विधानसभा अध्यक्ष कोणती भूमिका घेणार?, याकडे सर्वपक्षीय आमदारांचे लक्ष लागले आहे.