
देवरूख- संगमेश्वर तालुक्यातील सोनवडे येथील माध्यमिक विद्यालय येथे विद्यार्थ्यांसाठी सेवा सहयोग फाउंडेशन, मुंबई व एस. आय. ग्रुप ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला एस. आय. ग्रुपचे कंपनी सेक्रेटरी व सेवा सहयोग संस्थेचे समन्वयक सचिन अणेराव, प्रोजेक्ट मॅनेजर दिपाली देवळे सेवा सहयोग संस्थेचे सहाय्यक व्यवस्थापक विशाल देसाई, समन्वयक राम रोकडे व राजेश मोरे यांच्यासह संस्थाध्यक्ष प्रभाकर सनगरे, मुख्याध्यापक शिवाजीराव बंडगर, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि शाळेचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत संस्थाध्यक्ष श्री. सनगरे यांनी केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. मुख्याध्यापक श्री. बंडगर यांनी आपल्या प्रास्ताविकात प्रशालेतील शैक्षणिक व सहशैक्षणिक कार्याचा आढावा घेऊन, प्रशालेच्या प्रगती व विकासाची माहिती दिली. शाळेच्या पुढील महत्वपूर्ण गरजा पूर्ण करण्यासाठी संस्थेकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. एस. आय. ग्रुपचे कंपनी सेक्रेटरी सचिन अणेराव यांनी सेवा सहयोग संस्था करीत असलेल्या विविधांगी कार्याची माहिती देऊन, शैक्षणिक संस्थांकडून असणाऱ्या अपेक्षा स्पष्ट केल्या.
विशाल देसाई यांनी सेवा सहयोग संस्था शाळांना आवश्यक सुविधा पुरवण्यासाठी कशाप्रकारे सहाय्य करते याबाबत माहिती दिली. श्रीमती देवळे मॅडम यांनी इंटरनेटविषयक सुविधा पुरवण्याचा मानस व्यक्त करून, विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या. संस्थाध्यक्ष श्री. सनगरे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात मागे पडू नयेत, यासाठी सेवा सहयोग फाउंडेशन कोणती अपेक्षा न करता निरपेक्षवृत्तीने काम करत असल्याचे नमूद करून आभार व्यक्त केले. संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व शैक्षणिक साहित्य, क्रीडा साहित्य, तसेच नूतन इमारतीमधील एक वर्ग खोलीकरिता आर्थिक मदत केली असल्याचे याप्रसंगी नमूद केले. तसेच संस्थेकडून प्रत्येक वर्षी एस. एस. सी. परीक्षेत उत्तम गुण संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत गेली अनेक वर्ष संस्था करत असल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व पुढील सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सुलेखा मोहिते यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.
*फोटो-* शैक्षणिक साहित्य वाटपाप्रसंगी सेवा सहयोग फाउंडेशन आणि ए आय ग्रुपचे पदाधिकारी, संस्था पदाधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थी.
*छाया-* अमृत मेंगाल