
धुळे – धुळ्यामधील शिरपूर तालुक्यातील बाळदे येथे सबस्टेशन कार्यालयात कार्यरत असलेल्या प्रवीण विजय गवते यांनी माझ्याजवळ तीन लाख रुपये असून माझ्या पाठीमागे काही अनोळखी गुंड लागल्याचा मेसेज आपल्या ऑफिसच्या व्हॉट्सअप्प ग्रुप वर टाकल्यानंतर पुढील दोन तासाने प्रवीण गवते यांचा मृतदेह तापी नदीपात्रात आढळून आला, याप्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असली तरी ही आत्महत्या आहे की घातपात याबाबतचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
शिरपूर तालुक्यातील बाळदे येथील सबस्टेशन येथे प्रवीण विजय गवते वय ४२ रा.चिमठाणे ता. शिंदखेडा येथे सिनीअर ऑपरेटर म्हणून कार्यरत होते. त्यांची काल दुपारी तापी नदी पुलावर मोटरसायकल बेवारस स्थितीत आढळून आली होती. प्रवीण गवते यांची रात्रपाळी असल्याने ते रात्रीपासून बाळदे येथील सबस्टेशनवर होते. सकाळी ८:३० वाजता ते घरी चिमठाणे येथे जाण्यासाठी निघाले होते. मात्र दुपारी २ वाजून ५२ मिनिटांनी त्यांनी व्हॉट्स ॲप ग्रुपवर एक मॅसेज टाकला ज्यात म्हटले की, माझ्या मागे ४-५ गुंड मुले लागले असून हे सर्व अनोळखी आहेत. मला काहीच सुचत नाही आहे. माझ्यासोबत तीन लाख रूपये आहेत. मी कसा तरी स्व:ताला वाचवण्याचा प्रयत्न करत असून मला मदत करा, अशा स्वरूपाचा त्यांनी व्हॉट्सअप ग्रुपवर मॅसेज टाकला होता. ग्रुपमधील मॅसेज वाचून त्यांना संपर्क देखील साधण्यात आला होता.
या घटनेनंतर त्यांची मोटरसायकल गिधाडे तापी पुलावर आढळून आली होती. त्यांचा गिधाडे तापी नदीपात्रात शोध सुरु केला असता ४:३० ते ५ वाजेच्या सुमारास प्रवीण गवते यांचा तापी नदी पात्रात मृतदेह आढळून आला. त्यांचा मृतदेह शिंदखेडा येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला. मयत प्रवीण गवते यांच्या व्हॉट्स ॲप ग्रुपवरील मॅसेजमुळे अनेक तर्क वितर्क लावण्यात येत असून याप्रकरणात पोलीस काय भुमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. याप्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र प्रवीण गवते यांची ही आत्महत्या आहे की घातपात याबाबतचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.