शिवसेना, भाजपा युतीच्या कार्यकर्त्यांसोबत विविध सामाजिक, शैक्षणिक संस्थांचा उत्स्फूर्त सहभाग…

जनशक्तीचा दबाव न्यूज | देवरुख | एप्रिल ०६, २०२३.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्यसंगरातील मोठे नाव. सशस्त्र क्रांतीचे पुरस्कर्ते आणि अनेक क्रांतीवीरांचे प्रेरणास्रोत. मात्र स्वातंत्र्योत्तर काळात केवळ वैचारिक मतभिन्नतेमुळे तत्कालीन सरकारने त्यांची उपेक्षा केली. त्याचीच री ओढत काँग्रेस नेते, वायनाडचे माजी खासदार राहुल गांधी सातत्याने त्यांच्याविषयी अवमानकारक टिप्पणी करत असतात. केवळ सत्तेच्या लालसेपोटी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या तेजस्वी विचारांना हरताळ फासून उद्धव ठाकरेंनी काँग्रेसशी युती केली आणि त्यांना महाराष्ट्रात पुन्हा उर्जितावस्था आणली. सावरकरांचा होणारा अवमान त्यांनी मुग गिळून पाहीला मात्र त्याविरोधात अवाक्षर काढले नाही. हाच धागा पकडून शिंदे-फडणवीस सरकारने सावरकर गौरव यात्रेचे संपूर्ण महाराष्ट्रात आयोजन करण्याचे आवाहन केले. या आवाहनाला आत्तापर्यंत केवळ पक्षीय कार्यकर्त्यांनीच नव्हे तर समाजातील अनेक घटकांनी राष्ट्रप्रेमी, सावरकरप्रेमी या नात्याने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
काल देवरुख, ता. संगमेश्वर येथे भाजपा-शिवसेना कार्यकर्त्यांनी एकत्र येत सावरकर गौरव यात्रेचे आयोजन केले होते. यावेळी भाजपा प्रदेश सचिव, माजी आमदार श्री. प्रमोद जठार, शिवसेनेचे नेते माजी आमदार श्री. सदानंद चव्हाण, भाजपा तालुकाध्यक्ष श्री. प्रमोद अधटराव, शिवसेना तालुकाध्यक्ष श्री. प्रमोद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लोकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत संपन्न झाली. देवरुख येथील स्वातंत्र्यवीर सावरकर चौक येथे सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून यात्रेचा शुभारंभ झाला. यानंतर सह्याद्री नगर ते पंचायत समिती, संगमेश्वर (देवरूख) ते छत्रपती शिवाजी महाराज चौक व पुढे बाजारपेठेतून श्री देव विठ्ठल मंदिर अशा मार्गावरून तात्याराव सावरकर यांची चित्रफित बघत, जोरदार घोषणाबाजी आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत संपन्न झाली.
विविध सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, देवरुखातील प्रतिष्ठित व्यक्ती, जिल्हा व तालुका भाजपाचे पदाधिकारी, शिवसेना पदाधिकारी व विविध ठिकाणांहून आलेले सावरकरप्रेमी यांच्या उपस्थितीत गौरव यात्रा यशस्वीपणे पार पडली. अंतिम टप्प्यात भाजपा नेते प्रमोद जठार यांनी उपस्थितांना संबोधित केले. ते म्हणाले, “सावरकर समजून घेण्याचा प्रयत्न राहुल गांधी व त्यांच्या समर्थकांनी करण्याची गरज आहे. आपले संपूर्ण कुटुंब उध्वस्त होत असतानाही देशाची काळजी वाहणारा नेता आपल्याला लाभला आहे. केवळ विचारसरणी विरोधी असल्याने सातत्याने काँग्रेस तात्यारावांची मानहानी करण्याचा प्रयत्न करत आहे. पं त्यांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी, सावरकर हे सूर्य आहेत, त्यांच्यावर थुंकण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे शिंतोडे तुमच्यावरच पडणार आहेत. राजकारण करताना राष्ट्रपुरुषांच्या मर्यादा राखून टीका करावी. स्वातंत्र्यवीर सावरकर हे सर्वार्थाने देशाचा गौरव आहेत.”
