चिपळूण : घरे टार्गेट करून चोऱ्या करणाऱ्या टोळीचा सातारा पोलिसांनी पर्दाफाश करून सहा गुन्हे उघड केले. संशयितांकडून चोरीचा साडेदहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, संशयितांनी सातारा जिल्ह्यासह रत्नागिरी जिल्ह्यातही चोऱ्या केल्याचे समोर आले आहे.सातारा जिल्ह्यातील वाढत्या घरफोडय़ांमुळे पोलीस संशयितांची माहिती घेत होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला चोरीचे साहित्य किक्री करण्यासाठी काही संशयित दहिवडी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांचे पथक गस्तीवर असताना टेम्पो व कारमधून आलेल्यांची चौकशी केली. मात्र, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये साहित्य होते. पोलिसांनी साहित्याबाबत विचारणा केल्यानंतर मात्र त्यांनी ते चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची वाहने जप्त केली.आरोपींनी रहिमतपूर, औंध, दहिवडी, सातारा तालुका (जि. सातारा) व चिपळूण (जि. रत्नागिरी) पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चोऱ्या केल्या असल्याची कबुली दिली