ग्रामपंचायत वेश्वी तालुका उरण जिल्हा रायगड येथील सरपंच संदीप कातकरी हे तीन अपत्ये असल्याने अपात्र…

Spread the love

जिल्हाधिकारी रायगड डॉ योगेश म्हसे यांनी दिला ऐतिहासिक निर्णय.

उरण दि १(विठ्ठल ममताबादे )
वेश्वी गावातील सामाजिक कार्यकर्ते व सरपंच पदाचे उमेदवार तक्रारदार गोपाळ पाटील गुरुजी यांनी विद्यमान सरपंच संदीप कातकरी यांना तीन अपत्ये असल्याने ते सरपंच पदासाठी अपात्र असल्या बद्दल निवडणूक प्रक्रिये अंतर्गत जिल्हाधिकारी रायगड यांच्या न्यायालयात अपील दाखल केले होते. त्या संदर्भात योग्य त्या सूनावण्या घेवून दोन्ही बाजूच्या पक्षकारांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देवून सदरहू केस चा निकाल निर्णयावर ठेवण्यात आला होता. सदर सुनावणी दरम्यान गट विकास अधिकारी उरण यांनी संबंधित ग्रामपंचायत येथे चौकशी करून संदीप कातकरी यांना तीन अपत्ये असल्याचा स्पष्ट रिपोर्ट दिला होता.

संदीप कातकरी यांच्या पहिल्या पत्नी यांच्या पासून दोन अपत्ये व दुसऱ्या पत्नी पासून एक अपत्ये अशी एकूण तीन अपत्ये असल्याचे चौकशी दरम्यान निष्पन्न झाले असे त्या अहवालात नमूद केले आहे. पहिली पत्नी ही डाउर नगर तालुका उरण येथील असून दुसरी पत्नी वासांबे तालुका खालापूर येथील असल्याचे समजते.दिनांक ३०/११/२०२३ रोजी जिल्हाधिकारी रायगड डॉ योगेश म्हसे यांनी सर्व पुराव्यांची योग्य ती पडताळणी करून संबंधित तालुक्यांच्या अधिकाऱ्यांचा अहवाल मागवून विद्यमान सरपंच संदीप कातकरी यांना सरपंच पद किंवा सदस्य पदासाठी अपात्र ठरवून तक्रार दार गोपाळ पाटील गुरुजी यांच्या बाजूने निकाल दिला आहे. गोपाळ पाटील गुरुजी यांनी एकट्याने हा लढा दिला असून ते कोणत्याही क्षणी डगमगले नाहीत. हा निर्णय सरपंच पदासाठी उमेदवार म्हणून उभे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्ती साठी ऐतिहासिक ठरणार आहे.सदर लढा हा संदीप कातकरी यांच्या विरोधात वैयक्तिक स्वरूपाचा नसून हा लढा भ्रष्ट व्यवस्थे विरोधात असल्याचे गोपाळ पाटील गुरुजींनी सांगितले.

कोट (चौकट ):- रायगड जिल्हाधिकारी माननीय श्री. योगेश म्हसे यांनी माझ्या बाबतीत दिलेला निर्णय हा एकतर्फी आहे. माझे कोणतेही म्हणणे त्यांनी एकूण न घेता हा निर्णय दिलेला आहे. आमची बाजू न ऐकता हा निर्णय घेतला गेला आहे. या निर्णया विरोधात मी मुंबई उच्च न्यायालयात जाणार आहे.रायगड जिल्हाधिकारी यांनी दिलेला निर्णय मला मान्य नाही. तक्रारदार गोपाळ पाटील यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे आहेत.

  • संदीप कातकरी, सरपंच वेश्वी ग्रामपंचायत, उरण

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page