नागपूर – महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे यांच्या कारने रविवारी मध्यरात्री पाच दुचाकी व चारचाकी वाहनांना धडक दिली. या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना प्राथमिक वैद्यकीय उपचार देऊन लागलीच घरी सोडण्यात आल. मात्र, आता अपघातावेळी नेमकं काय घडलं? याबाबत सविस्तर माहिती समोर आली आहे. नागपूर झोन दोनचे डीसीपी राहुल मदने यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली आहे. त्यात अपघातावेळी संकेत बावनकुळे कारमध्येच होते, असं त्यांनी सांगितलं आहे.
नेमकं काय घडलं रविवारी मध्यरात्री?
रविवारी मध्यरात्री नागपूरच्या सीताबर्डी भागात एका ऑडी कारनं काही वाहनांना धडक दिली. यामध्ये कुणीही गंभीर जखमी झालेलं नाही. मात्र, वाहनांचं नुकसान झालेलं आहे. या प्रकरणाचं सीसीटीव्ही फूटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावरून बरीच चर्चा सुरू झाली आहे. ही कार भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुत्र संकेत बावनकुळे यांच्या मालकीची असल्याचं स्पष्ट झालं आहे. आधी कारची नंबरप्लेट काढून ठेवल्याचं दिसून आलं. मात्र, नंतर ही नंबरप्लेट कारमध्येच असल्याचं पोलिसांना आढळून आलं.
WATCH | Nagpur, Maharashtra: DCP Zone 2, Rahul Madane says, “The incident occurred at 12.30 am on 9th September…A white Audi, registered under the name of Sanket Bawankule, was involved in the incident. We have questioned all the three occupants of the car. We arrested the… https://t.co/WcINRZX9Vt pic.twitter.com/QDyThbVYVK
— ANI (@ANI) September 10, 2024
अपघात घडला तेव्हा संकेत बावनकुळे कारमध्ये होते की नाही? याबाबत सुरुवातीला स्पष्टता नव्हती. मात्र, ते तेव्हा कारमध्येच होते, अशी माहिती आता समोर आली आहे. पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी पत्रकार परिषदेत या घटनेसंदर्भात तपशील दिला आहे. ‘चालक अर्जुन हावरे, संकेत बावनकुळे, रोनित चित्तमवार हे तिघे गाडीत होते. त्यानुसार आपण तिघांनाही चौकशीसाठी बोलवलं होतं. चौकशी झाली आहे. चालकाला अटक केली होती. रात्री उशीरा त्याला जामीन देण्यात आला आहे’, असं मदने म्हणाले.
संकेत बावनकुळे नेमके कुठे बसले होते?
दरम्यान, अपघातावेळी संकेत बावनकुळे कुठे बसले होते, याबाबत पोलिसांनी माहिती दिली आहे. कार अर्जुन हावरे चालवत होता तर संकेत बावनकुळे ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर आणि तिसरी व्यक्ती रोनित चित्तमवार मागच्या सीटवर बसले होते. याशिवाय, अपघात झाल्यानंतर पुढच्या चौकात या तिघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता जमावानं त्यांना अडवलं व काहींनी मारहाणही केल्याच्या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिला आहे. मात्र, संकेत बावनकुळेंना मारहाण झाली किंवा नाही, याबाबत पोलिसांनी स्पष्ट माहिती दिलेली नाही.
हॉटेलमधून घरी जाताना अपघात
दरम्यान, रात्री एका हॉटेलमधून जेवण करून घरी जात असताना हा अपघात घडल्याचं सीसीटीव्ही फूटेजच्या तपासात दिसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. ‘यावेळी चालक नशेत होता असं आढळून आलं आहे. डॉक्टरांनी तसे रिपोर्ट दिले आहेत. त्यांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. रात्री दोघांना पोलिसांनी पकडलं होतं. त्या दोघांची वैद्यकीय चाचणी केली होती. त्यात ते नशेत होते असा अहवाल डॉक्टरांनी दिला आहे. चालकावर गुन्हा दाखल आहे. रोनित वा संकेतवर गुन्हा दाखल नाही. त्याबाबत तपास चालू आहे’, अशी माहिती पोलिसांनी दिली.
‘आत्तापर्यंत तीन गाड्याचं नुकसान झालेलं आहे. यात कुणीही गंभीर जखमी झालेलं नाही. त्यांच्यावर उपचार करून त्यांना लगेच घरी सोडण्यात आलं आहे’, असंही मदने म्हणाले.