डर्बन- भारताचा फलंदाज संजू सॅमसनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्याच टि-20 सामन्यात धावांचा पाऊस पाडताना शतक तर झळकावले, पण त्याचबरोबर एक ऐतिहासिक कामगिरीही केली आहे. संजू सॅमसनने यावेळी असा एक महा रेकॉर्ड रचला आहे की, जो आतापर्यंत कोणालाच जमलेला नाही.
संजू सॅमसनने संघासाठी पहिला चौकार लगावला आणि झोकात सुरुवात करून दिली. त्यानंतर केशव महाराजच्या एकाच षटकात चौकार आणि षटकार ठोकत आपले इरादे स्पष्ट केले. त्यानंतर संजूने सलग दोन षटकार लगावले आणि आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर संजूने शतकाच्या दिशेने कूच केली. संजू त्यानंतर शतकासमीप कसा पोहोचला, हे कोणालाही कळले नाही. कारण संजूने एकामागून एक धडाकेबाज फटकेबाजी केली आणि सहजपणे त्याने नव्वदी गाठली. संजूने ९९ धावांवर असताना एकेरी धाव घेत आपले शतक पूर्ण केले आणि स्टेडियममध्ये त्याच्या नावाचा एकच जयघोष भारताच्या चाहत्यांनी केला. पण या शतकासह आता संजूने एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
संजूने यावेळी फक्त ४७ चेंडूंत सात चौकार आणि ९ षटकारांच्या जोरावर आपले शतक साजरे केले, त्यानंतर संजू हा १०७ धावांवर बाद झाला. पण त्यापूर्वी संजूने आपले काम चोख बजावले. यापूर्वी जेव्हा बांगलादेशविरुद्धचा तिसरा टी २० सामना खेळवला गेला होता, त्यावेळी संजूने आपले पहिले शतक झळकावले होते. त्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेतीस पहिल्या सामन्यात संजूने शतक पूर्ण केले आहे. टी २० क्रिकेटमध्ये सलग दोन शतकं झळकावणारा तो पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही अशी कामगिरी आतापर्यंत टी २० क्रिकेटमध्ये करता आलेली नाही. त्यामुळे टी २० क्रिकेटमध्ये सलग दोन शतकं झळकावणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. संजूने या सामन्यात दमदार फटकेबाजी केली आणि आपले शतक साजरे केले. भारताला चांगली सुरुवात करून देण्यापासून ते धावांचा डोंगर उभारण्यापर्यंत संजून यावेळी महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे संजूवर क्रिकेट विश्वातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.