मुंबई : शितल म्हात्रे व्हायरल व्हिडीओ प्रकरणावर बोलताना राज्यात सध्या ‘मुका घ्या मुका’ सिनेमा सुरू आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली होती. त्यांच्या या टीकेवर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत.दरम्यान, भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनीही राऊतांच्या टीकेवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊतांनी या प्रकरणात त्यांचं ज्ञान पाजळू नये, असे त्या म्हणाल्या. नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
सर्वज्ञानी असलेले संजय राऊत, त्यांची महिलांबद्दल असलेली त्यांची भूमिका, महिलांविषयी असलेली त्यांनी मानसिकता ही संपूर्ण महाराष्ट्राने बघितली आहे. त्यामुळे त्यांनी अशा प्रकरणावर भाष्य करणं न केलेलंच बरं. त्यांचे खायचे आणि दाखावायचे दात वेगळे आहेत. हे संपूर्ण राज्याला माहिती आहे. त्यांनी एका महिलेला वाहिलेली शिव्याची लाखोली आजही महाराष्ट्र विसरलेला नाही. त्यामुळे संजय राऊत यांनी त्यांचं ज्ञान या विषयाततरी पाजळू नये”, अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली.