
मुंबई – सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शिवसेनेच्या 16 आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी आज (25 सप्टेंबर) विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात पार पडली.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुनावणी घेतली. आज झालेल्या सुनावणीत शिवसेना ठाकरे गटाकडून वकील देवदत्त कामत यांनी बाजू मांडली. तर शिंदे गटाकडून अनिलसिंह साखरे यांनी बाजू मांडली.
आता पुढील सुनावणी 13 ऑक्टोबर रोजी होणार आहे. ही केस कशी चालवायची याचे वेळापत्रक येत्या दोन ते तीन दिवसात विधानसभा अध्यक्ष देणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, यावेळी ठाकरे गटाकडून अनिल परब, अनिल देसाई, सुनील प्रभू यांच्यासह मुंबईतील आमदार उपस्थित होते.
आमदार अपात्रताप्रकरणी दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी निकाल राखून ठेवला आहे, अशी माहिती शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी दिली आहे.
दोन्ही गटाचा युक्तीवाद
आमदारांच्या अपात्रतेसंबंधित ज्या काही 40 याचिका आल्या आहेत त्या सर्व याचिका एकत्र करा अशी आमची मागणी आहे ते का केलं जातं नाही. यातील याचिकांचा विषय एकच असल्याने एकत्रित याचिकावर सुनावणी घेतल्यास या सगळ्या प्रकरणा संदर्भात निर्णय घेण्यास वेळ कमी लागेल आणि तातडीने निर्णय देणे शक्य होऊ शकेल. मात्र याला शिंदे गटाच्या वकिलांनी विरोध केला. शिंदे गटाचे वकील अनिल साखरे यांनी सर्व याचिका एकत्र नको, त्यांची वेगवेगळी सुनावणी घ्या असा युक्तिवाद केला. आम्हाला स्वतंत्र पुरावे द्यायचे आहेत. यामुळे आमदारांची स्वतंत्र सुनावणी व्हावी असे आमचे म्हणणे आहे.
दरम्यान, सुनावणीनंतर शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया समोर येत आहेत. यावेळी आजच्या सुनावणीसंदर्भात प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना थेट इशाराच दिला आहे.
संजय राऊत म्हणाले, “विधानसभा अध्यक्षांना संविधान, घटना आणि कायदा पाळावा लागेल. आज तुम्ही त्याचे उल्लंघन केले आहे. पण, भविष्यात सरकार बदलतात. तुम्हाला किंमत मोजावी लागणार आहे,” एका मराठी खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत काय म्हणाले ?
सगळी यंत्रणा निर्ढावलेली आहे. विधानसभा अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचा निर्देश मानायला तयार नाहीत. त्यांच्याकडे लोकशाही संदर्भात कोणती अपेक्षा ठेवायची? एका राजकीय पक्षाचे नेते आहात आणि विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसलात हे मान्य. पण, शेवटी देशातले संविधान, घटना आणि कायदा तुम्हाला पाळावा लागेल. आज तुम्ही त्याचं उल्लंघन केलं आहे. मात्र, भविष्यात सरकार बदलतात आणि तुम्हाला किंमत मोजावी लागणार, असा इशारा संजय राऊत यांनी राहुल नार्वेकरांना दिला आहे.
संजय शिरसाट काय म्हणाले ?
सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे वेळापत्रक ठरवण्यावर युक्तिवाद झाला. सर्व याचिका एकत्रित करण्याची गरज नाही असे आमच्या वकिलांनी सांगितले. न्यायालयाच्या डायरेक्शन नुसार शेड्यूल ठरवण्यासाठी अध्यक्षांनी निर्णय राखून ठेवला आहे. प्रत्येक वकिलाने सांगितले की आम्हाला स्वतंत्र पुरावे द्यायचे आहेत. यामुळे आमदारांची स्वतंत्र सुनावणी व्हावी असे आमचे म्हणणे आहे.
अपात्रतेची टांगती तलवार असणाऱ्या आमदारांची नावे –
१. एकनाथ शिंदे
२ .अब्दुल सत्तार
३. संदीपान भुमरे
४. संजय शिरसाट
५. तानाजी सावंत
६. यामिनी जाधव
७. चिमणराव पाटील
८.भरत गोगावले
९.लता सोनवणे
१०. प्रकाश सुर्वे
११. बालाजी किणीकर
१२. अनिल बाबर
१३. महेश शिंदे
१४. संजय रायमूलकर
१५. रमेश बोरणारे
१६. बालाजी कल्याणकर