मुंबई:- नवीन संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते न होता ते देशाचे प्रथम नागरिक असलेल्या राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावे, अशी मागणी विरोधकांकडून होत असतानाच खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर निशाणा साधला. आताचे संसद भवन अजून शंभर वर्ष टिकेल अशा स्थितीत असताना देखील सेंट्रल व्हिस्टा या नव्या संसद भवनाची उभारणी करून सरकारी तिजोरीवर भार टाकण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
दरम्यान दिल्लीत गांधी परिवाराने विविध वास्तूंचे उद्घाटन केल्याच्या पाट्या आहेत, या पाट्या पुसण्यासाठीच हा घाट मोदी सरकारने घातलेला आहे, असं देखील संजय राऊत यावेळी म्हणाले. शिवाय देशाच्या प्रमुख असलेल्या राष्ट्रपतींना डावलून या नवीन संसदेचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करणं चुकीचं असल्याचं म्हणत त्यांनी या उद्घाटनाला विरोध दर्शवला.
एका आदिवासी महिलेला राष्ट्रपतीपदी बसवलंत तेव्हा मोठा गाजावाजा केला, मग आता का डावलताय? असा सवाल उपस्थित करत आम्ही या उद्घाटनावर बहिष्कार घालत आहोत असं देखील संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. याशिवाय काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष त्यावर बहिष्कार घालत आहेत, असं देखील मत संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.