
संगमेश्वर ( प्रतिनिधी ) केवळ दोन अडीच वर्षांपूर्वी नव्याने केलेल्या संगमेश्वर-देवरुख-साखरपा मार्गाची पूर्णतः दुरवस्था झाली असून या मार्गावर जागोजागी पडलेले खड्डे आणि रस्त्याच्या एका बाजूला जमा झालेली बारीक खडी यामुळे गत आठवड्यात तीन दुचाकीस्वार घसरुन पडले आहेत . वाहनांना अपघात होवून प्रवाशांचा जीव जाण्या आधीच सार्वजनिक बांधकाम विभागाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे .
करोडो रुपये खर्च करूनही ; वर्षाच्या आत खड्यांचे साम्राज्य.

संगमेश्वर देवरुख साखरपा या राज्यमार्गाची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उप अभियंत्यांनी तातडीने पाहणी करावी अशी मागणी वाहनचालकांनी केली असून या पाहणीनंतर त्यांनीच हा मार्ग किती धोकादायक झाला आहे याचा निष्कर्ष काढावा अशी अपेक्षा वाहनचाकांनी व्यक्त केली आहे . जून महिन्यामध्ये भर पावसात या मार्गावर काही ठिकाणी सीलकोटचे काम करण्यात आले . पावसामुळे या सीलकोटच्या कामाचा पूर्णत: फज्जा उडाला असून सीलकोट नंतर मारलेली सर्व बारीक रेव रस्त्याच्या दोन्ही बाजूला जमा झाली आहे. रात्रीच्या वेळी ही बारीक रेव दुचाकीच्या अपघातास कारणीभूत ठरत आहे . सदर बारीक रेव तातडीने बाजूला करणे आवश्यक असताना याबाबत कोणतीही कार्यवाही होत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे
संगमेश्वर-देवरुख राज्यमार्ग वाहतुकीस बनला अत्यंत धोकादायक !

संगमेश्वर ते नवनिर्माण महाविद्यालया दरम्यान एका अवघड वळणार संगमेश्वरकडे जाताना डाव्याबाजुला एक लांबरुद जीवघेण्या खड्यात आत्तापर्यंत तीन दुचाकी आपटून अपघात घडला असून सुदैवाने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले नाहीत . वेगातील चारचाकी कार अथवा रिक्षा या खड्ड्यात आपटल्यास पलटी होण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे . वळणावरील हा जीवघेणा खड्डा तातडीने न बुजवल्यास येथे घडणाऱ्या अपघाताबाबत बांधकाम विभागास जबाबदार धरले जाणार असल्याचा इशाराही वाहनचालकांनी दिला आहे .
संगमेश्वर मारुती मंदिराजवळ तर रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे . या ठिकाणी केवळ खड्डे बुजवून रस्ता सुरळीत होणार नसून येथील मोठा पॅच नव्याने करणे आवश्यक बनले आहे . अशीच स्थिती अनेक ठिकाणी निर्माण झाली आहे . ठिकठिकाणी पडलेले मोठे खड्डे तातडीने बुजवणे आवश्यक असल्याचे वाहनचालकांनी नमूद केले आहे .
जाहिरात

जाहिरात

जाहिरात
