जनशक्तीचा दबाव न्यूज | संगमेश्वर | मे ०६, २०२३.
माध्यमिक विद्यालय, सोनवडे (ता. संगमेश्वर) रत्नागिरी जिल्हा व संगमेश्वर तालुका खो-खो असोसिएशन यांच्या सहकार्याने माध्यमिक विद्यालय, सोनवडे व आजी-माजी विद्यार्थी माध्यमिक विद्यालय, सोनवडे यांच्या संयुक्त विद्यमाने पुरुष खुला गट जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धा नुकत्याच आनंददायी वातावरणात संपन्न झाल्या. या स्पर्धेचे विजेतेपद सनगलेवाडी, वांझोळे (ता. संगमेश्वर) संघाने फणसवणे (ता. संगमेश्वर) संघावर ८ गुणांनी मात करून प्राप्त केले. या स्पर्धेत तृतीय क्रमांक मारळ (ता. संगमेश्वर) संघाने, तर चतुर्थ क्रमांक लांजा संघाने प्राप्त केला. स्पर्धेतील पहिले तीन क्रमांक संगमेश्वर तालुक्यातील संघांनी प्राप्त करून या स्पर्धेवर संगमेश्वर तालुक्याची मोहर उमटवली. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू निखिल सनगले, सर्वोत्कृष्ट आक्रमण साहिल सनगले (दोघे सनगलेवाडी) तर उत्कृष्ट संरक्षक आशिष बालदे (फणसवणे) यांची निवड करण्यात आली.
स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी संदीप तावडे, सौ. सीमा यशवंतराव यांच्यासह रत्नागिरी जिल्हा व संगमेश्वर तालुका खो-खो संघटनेचे पदाधिकारी, सोनवी घडघडी परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर सनगरे व पदाधिकारी, सदस्य, मुख्याध्यापक शिवाजी बंडगर, यांच्यासह प्रशालेचे आजी-माजी विद्यार्थी आणि क्रीडाप्रेमी ग्रामस्थ यांची उपस्थिती होती. या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील मातब्बर १६ संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेतील पहिल्या उपांत्य सामन्यात सनगलेवाडीने मारळवर १ गुण व ६ मिनिटे राखून विजय प्राप्त केला, तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात फणसवणेने लांजावर २ गुणांनी मात केली. अंतिम सामन्यात सनगलेवाडीने फणसवणे संघावर ८ गुणांनी विजय प्राप्त करून विजेतेपदाचा चषक पटकावला. फणसवणे संघातील वयाने लहान असणाऱ्या खेळाडूंनी जिगरबाज खेळ करून रसिकांची मने जिंकली. फणसवणे संघात राष्ट्रीय खो-खो स्पर्धेचे विजेतेपद प्राप्त करणाऱ्या महाराष्ट्र किशोर खो-खो संघातील अथर्व गराटेचा समावेश होता. फणसवणे संघाला अरुण सावंत, तर सनगलेवाडी संघाला सदानंद आग्रे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
विजेतेपदाचा चषक व रु.७,७७७/-देऊन संजय घाग यांनी सनगलेवाडी संघाला सन्मानित केले. याप्रसंगी संस्थाध्यक्ष प्रभाकर सनगरे, क्रीडा शिक्षक अभिजीत कदम, शेखर गुरव, मंगेश घाग, योगेश शिंदे, प्रभाकर गुरव, अभिमन्यू शिंदे यांच्यासह क्रीडाप्रेमी ग्रामस्थ उपस्थित होते. संपूर्ण स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी रत्नागिरी जिल्हा व संगमेश्वर तालुका खो-खो असोसिएशनचे पदाधिकारी, पंचप्रमुख प्रशांत देवळेकर व सहकारी, प्रशालेचे क्रीडा शिक्षक अभिजीत कदम, इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, संस्था पदाधिकारी व सदस्य, प्रशालेचे आजी-माजी विद्यार्थी, ग्रामस्थ यांचे उत्तम सहकार्य लाभले.