बीएसयूपी घोटाळ्यातील ठामपा अधिकाऱ्यांवर एसीबी कारवाईची टांगती तलवार
– ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घेतली मनसेच्या संदीप पाचंगे यांच्या तक्रारीची दखल

Spread the love

ठाणे, (प्रतिनिधी) : ठाणे महापालिकेचा बीएसयूपी प्रकल्प घोटाळा पुन्हा एकदा चर्चेला आला आहे. बीएसयूपीमध्ये लागलेली भ्रष्टाचाराची कीड रोखण्यासाठी दीड वर्षांपूर्वी मनविसेचे राज्य सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी गोरगरिबांच्या घरांमध्ये अनधिकृतरित्या बिर्‍हाड थाटणार्‍या बोगस सदनिकाधारकांचा पर्दाफाश केला होता. याची दखल आता ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घेतली असून या तक्रारीबाबत पाचंगे यांचा जबाबही नोंदवून घेण्यात आला आहे. त्यामुळे आता पालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना लवकरच कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
शहरे झोपडपट्टीमुक्त व्हावे तसेच गरिबांना घरकुले मिळावी, या उद्देशाने केंद्र सरकारने बेसिक सर्व्हिसेस फॉर अर्बन पुअर अर्थात बीएसयूपी योजना राबविली. मात्र या योजनेतही पालिकेची भ्रष्टाचाराची गटारगंगा वाहू लागली. ठाण्यातील धर्मवीर नगर येथे २०१३ मध्ये बीएसयुपी योजनेंतर्गत उभारलेल्या आनंदकृपा सोसायटी इमारत क्रमांक २३ मध्ये रहिवाशांना सदनिका दिल्या होत्या. या इमारतींमधील ६०३, ८०२,८०४, ८०५ व ८०७  यासदनिकांचा अनधिकृतरित्या ताबा घेतला होता. ही तक्रार मनसेचे संदीप पाचंगे यांच्याकडे आली होती. सोसायटीच्या रहिवाशांनी याप्रकरणी पालिकेकडे तक्रार करूनही बोटचेपे धोरण स्वीकारल्याने अखेर पाचंगे यांनी कारवाईसाठी पाठपुरावा केला. शिवसेनेच्या शाखाप्रमुखा सह ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. बीएसयुपी इमारतीत नक्की राहते कोण याची पडताळणी करण्यात येणार होती मात्र दीड वर्षांपूर्वी केवळ कारवाईच्या नावाखाली चौकशी समिती नेमण्यात आली पण संबंधित अधिकाऱ्यांवर कोणतीच कारवाई झाली नव्हती. दरम्यान या प्रकरणाची ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणाची दखल घेतली असून बीएसयूपी प्रकल्प घोटाळ्याच्या तक्रारीवरून जबाब नोंदवून घेतला असून कागदपत्रेही सादर करण्यात आली आहेत. त्यामुळे लवकरच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता असल्याचे पाचंगे यांनी नमूद केले.


चौकशी समिती नावापुरतीच

दीड वर्षांपूर्वी बीएसयूपीतील अनागोंदी कारभार समोर आल्यानंतर ठाणे महापालिकेने तत्कालीन आयुक्त विपीन शर्मा यांनी अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांच्या अध्यक्षतेखाली ७ सदस्यांची चौकशी समिती नेमली होती मात्र चौकशी समिती नेमूनही गेल्या दीड वर्षात या घोटाळ्याप्रकरणी कोणावरही कारवाई झालीच नाही. त्यामुळे मनविसेच्या वतीने सातत्याने पाठपुरावा सुरूच आहे. लाचलुचपत विभागाने दखल घेतल्यामुळे आता या प्रकरणात लवकरच संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.



“भाडेखाऊ” गजाआड कधी होणार?

२०१३ पासून या योजनेतील उरलेल्या घरांमध्ये अनधिकृत रित्या लोक राहत आहेत. या लोकांकडून स्थानिक गुंड महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या साथीने भाडे उकळत होते. बऱ्याच ठाणेकरांना घरे मिळवून देतो म्हणून फसविण्यात आले आहे. बीएसयुपी प्रकल्पाच्या घरे बांधणी पासून ते सदनिका वाटप या सर्वच बाबतीत भ्रष्टाचार झाला आहे. सध्या राहणारे नागरिक देखील त्रस्त आहेत अद्याप सोसायटी हस्तांतरित झालेल्या नाहीत. चौकशी समिती अहवाल अद्याप बाहेर न आल्यामुळे काही अधिकारी भ्रष्टाचारात सामील असल्याचे सिद्ध होते आहे.- संदीप पाचंगे.सरचिटणीस,

महाराष्ट्र राज्य.महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page