नाशिक : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेतील बंडखोरीनंतर पक्षावरील दाव्यावर अखेर निर्णय दिला आहे. यानुसार आयोगाने शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं आहे. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. यावर माजी खासदार आणि स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतिक्रिया दिली. ते नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
संभाजीराजे छत्रपती म्हणाले, “निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय लोकशाहीचा भाग आहे. ज्यांना जे चिन्ह मिळालं त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत, पण माझ्या दृष्टीने चिन्ह आणि नाव कुणाला मिळालं याचं लोकांना किती देणंघेणं आहे हे माहिती नाही. आमचे प्रश्न कधी सुटणार इतकंच लोकांना जाणून घ्यायचं आहे. मागील दोन तीन वर्षातील अस्थिर सरकारमुळे लोकांचे प्रश्न सुटलेले नाहीत. त्यामुळे निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय प्रक्रियेचा भाग आहे.”
“मी अनेक प्रश्न घेऊन सरकारकडे जातो, तेही अद्याप सुटले नाहीत”
“माझी सरकारला विनंती असणार आहे की, त्यांनी लोकांचे प्रश्न लवकरात लवकर सोडवावे. मी अनेक प्रश्न घेऊन सरकारकडे जातो. ते प्रश्नही अद्याप सुटलेले नाहीत. पक्षाचं नाव आणि चिन्हा हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. त्याच्याशी स्वराज्य संघटनेचा काहीही संबंध नाही. स्वराज्यच्या वतीने आमच्या त्यांना शुभेच्छा,” असं मत संभाजीराजेंनी व्यक्त केलं.
जाहिरात :