
रत्नागिरी : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या सन २०२४-२५ अंतर्गत जिल्हा परिषदेकडून विजेत्या ग्रामपंचायतींची घोषणा करण्यात आली आहे. जिल्ह्यात नाचणे ग्रामपंचायतीने प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. ग्रामपंचायतीला ६ लाख रुपयांचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तसेच द्वितीय क्रमांक राजापूर तालुक्यातील खरवते ग्रामपंचायतीला मिळाला असून, त्यांना ४ लाख रुपये पुरस्कार, संगमेश्वर तालुक्यातील हातिव ग्रामपंचायतीची निवड तृतीय क्रमांकासाठी झाली आहे. त्यांना ३ लाख रुपये प्रदान करण्यात येणार आहेत.
विशेष पुरस्कारासाठी संगमेश्वर तालुक्यातील आंबव ग्रामपंचायतीला ५० हजारांचा स्व. वसंतराव नाईक पुरस्कार सांडपाणी व्यवस्थापनासाठी प्राप्त झाला आहे. पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन याच्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार दापोली तालुक्यातील विरसई या ग्रामपंचायतीला प्राप्त झाला आहे. त्यांनाही ५० हजार रुपयांचा पुरस्कार मिळणार आहे. शौचालय व्यवस्थापनमध्ये स्व. आबासाहेब खेडेकर पुरस्कार गुहागर तालुक्यातील खामशेत ग्रामपंचायतीला प्राप्त झाला असून त्यांना ५० हजार रुपये पुरस्कार दिला जाणार आहे. पुरस्कारांची घोषणा उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पाणी व स्वच्छता विभागाचे राहुल देसाई यांनी केली आहे.