
नवी दिल्ली- शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्स संघाची या हंगामात तुफानी कामगिरी सुरूच आहे. गुजरात टायटन्स आयपीएल 2025 च्या प्लेऑफसाठी पात्र झाला. साई सुदर्शनच्या शानदार शतक आणि कर्णधार शुभमन गिलच्या 93 धावांच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर, गुजरातने दिल्ली कॅपिटल्सचा एकतर्फी 10 विकेट्सने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने 199 धावा केल्या. केएल राहुलने शानदार शतक झळकावले, पण इतर फलंदाजांकडून त्याला तितकीच साथ मिळाली नाही. पण गिल आणि सुदर्शन यांनी मिळून हे लक्ष्य आरामात पार केले.
गुजरात टायटन्सच्या या विजयाने आणखी दोन संघांचे नशीब बदलले आहे. या दोन्ही संघांनी प्लेऑफची तिकिटेही निश्चित केली आहेत. याचा अर्थ असा की आता प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी फक्त एकच स्थान शिल्लक आहे आणि 3 संघ अजूनही शर्यतीत आहेत. गुजरात टायटन्सने हा सामना एकतर्फी जिंकला. या विजयाचा फायदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज संघांना झाला. आरसीबी आणि पंजाब किंग्ज यांनीही प्लेऑफसाठी पात्र झाले. गुजरातने आता 12 सामन्यांनंतर 9 विजय मिळवले आहेत आणि 18 गुणांसह टॉपवर आहे. दुसरीकडे, आरसीबी या हंगामात 17 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. पंजाब किंग्जचेही 17 गुण आहेत. याचा अर्थ असा की आता या संघांमध्ये टॉप-2 मध्ये स्थान मिळवण्यासाठी लढत आहे.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सला पहिला धक्का फाफ डु प्लेसिसच्या रूपात 16 धावांवर बसला. 5 धावा काढून फाफ आऊट झाला, पण त्यानंतर केएल राहुल आणि अभिषेक पोरेल यांनी दुसऱ्या विकेटसाठी 90 धावांची भागीदारी केली. यादरम्यान, दोन्ही फलंदाजांनी गुजरातच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला, परंतु त्यानंतर साई किशोरने अभिषेक पोरेलच्या रूपात दिल्ली कॅपिटल्सला दुसरा धक्का दिला. अभिषेक पोरेल 19 चेंडूत 30 धावा काढून आऊट झाला.
यानंतर, दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने 16 चेंडूत 25 धावांची खेळी खेळली, पण प्रसिद्ध कृष्णाने त्याची शिकार केली, परंतु केएल राहुल शेवटपर्यंत राहिला आणि शानदार शतक झळकावून नाबाद परतला. तर ट्रिस्टन स्टब्सने 10 चेंडूत 21 धावांचे योगदान दिले. केएल राहुलने 65 चेंडूत 112 धावांची नाबाद खेळी खेळली. यादरम्यान त्याने 14 चौकार आणि 4 षटकार मारले. केएल राहुलचे आयपीएलमधील हे पाचवे शतक आहे. केएल राहुल आयपीएलमध्ये 3 वेगवेगळ्या संघांसाठी शतक ठोकणारा पहिला खेळाडू ठरला आहे. दिल्ली कॅपिटल्सपूर्वी, केएल राहुलने लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्जसाठी शतके झळकावली आहेत. गुजरातकडून अर्शद खान, साई किशोर आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. दिल्ली कॅपिटल्सने दिलेल्या 200 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात चांगली झाली. साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांनी डावाची तुफानी सुरुवात केली आणि दोघांनीही चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. दिल्लीचे गोलंदाज विकेटसाठी आसुसलेले दिसून आले. एकीकडे साई सुदर्शनने 61चेंडूत 108 धावांची शानदार खेळी खेळली, तर दुसरीकडे कर्णधार शुभमन गिलही 93 धावा करून नाबाद परतला.