
मुंबई- काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी सागर बर्वे नावाच्या व्यक्तीला अटक केली. पोलिसांकडून कसून चौकशी सुरू असून, याबाबत महत्त्वाची माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिल्याचे सांगितले जात आहे. नैराश्यातून सागर बर्वेने ही धमकी दिली, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सागर बर्वेने सोशल मीडियावर दोन बनावट अकाउंट तयार करुन शरद पवारांबाबत अपशब्द लिहिल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी फेसबुककडूनही काही माहिती मागवली आहे.
आरोपी सागर बर्वेने नैराश्यातून धमकी दिल्याचा संशय पोलिसांना आहे. लग्न होत नसल्याने आणि सध्याच्या महाराष्ट्रातील परिस्थितीमुळे आणि औरंगजेबाच्या उदात्तीकरणाने सागर बर्वे नैराश्येत असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले आहे. आरोपी तपासात सहकार्य करत नसल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले आहे. तसेच सागर बर्वेने या आधीही सोशल मीडियावर अनेक आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्याचा दिसून आले आहे. सागर बर्वेच्या या आधीच्या सोशल मीडियावरील पोस्ट पाहता तो एका विशिष्ट विचारसरणीने भारावून गेल्याचे स्पष्ट दिसत आहे. मात्र, पोलिसांच्या मते त्याचे कोणत्याही संघटनेशी थेट संबंध असल्याचे आतापर्यंत समोर आलेले नाही. मुंबई पोलिसांनी फेसबुक आणि ट्विटरशी संपर्क साधून आणखी माहिती मागवली आहे.
दरम्यान, राजकारण महाराष्ट्रा चे या फेसबुक अकाउंटवर ‘नर्मदाबाई पटवर्धन’ या नावाने एक अकाउंट आहे. त्यावर असलेल्या पोस्टमध्ये शरद पवार यांना उद्देशून ‘तुझा लवकरच दाभोलकर होणार’, अशी धमकी देण्यात आली होती. तर सौरभ पिंपळकर नावाच्या ट्विटर हँडलवरुन शरद पवार यांची औरंगजेबासोबत तुलना करत आक्षेपार्ह भाषेचा वापर केलेला मजकूर प्रसिद्ध करण्यात आला होता.