महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. दरम्यान, महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनही कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला.
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान सुरु आहे. अशातच बुधवारी सकाळी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर पत्नी अंजली आणि मुलगी सारा तेंडुलकरसह मतदानासाठी मुंबईत पोहोचले. यावेळी तिघांनीही संपूर्ण प्रक्रियेचं पालन करुन मतदान केलं.
वांद्र्यातील केंद्रावर केलं मतदान :
सचिन तेंडुलकर मतदान करण्यासाठी मुंबईतील वांद्रे पश्चिममधील सेंट जोसेफ रोड येथील पाली चिंबई मुंबई पब्लिक स्कूल शाळेतील मतदान केंद्रात पोहोचला. त्याच्यासोबत पत्नी अंजली आणि मुलगी सारा तेंडुलकरही दिसली. सचिन तेंडुलकरला पाहताच शेजारी उपस्थित असलेले चाहतेही त्याला भेटण्यासाठी उत्सुक असल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे सचिन तेंडुलकर हा निवडणूक आयोगाचा ‘नॅशनल आयकॉन’ आहे.
काय म्हणाला सचिन :
मतदानाचा हक्क बजावल्यानंतर सचिन तेंडुलकर म्हणाला, “मी गेल्या काही काळापासून ECI (भारतीय निवडणूक आयोग) चा प्रतिक आहे. मतदान करा हा संदेश मी देत आहे. ही आपली जबाबदारी आहे. मी सर्वांना आवाहन करतो की, घराबाहेर पडून मतदान करा.” तसंच यानंतर त्यानं आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत, ‘हा विचार करुन आपल्या बोटावरील शाई दाखवण्याचा दिवस आहे, प्रत्येक मत अमुल्य आहे,’ असं त्यानं म्हटलंय.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान –
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. यामध्ये सत्ताधारी ‘महायुती’ सत्ता कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहे तर विरोधी महाविकास आघाडी (एमव्हीए) पुन्हा सत्तेत पुनरागमन करण्याच्या आशेवर आहे. विधानसभेच्या सर्व 288 जागांसाठी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान सुरु राहणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. यंदाच्या निवडणुकीत राज्यातील 288 जागांसाठी 4136 उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत.
सचिनला ऑस्ट्रेलियाला पाठवण्याचा सल्ला :
माजी भारतीय क्रिकेटपटू आणि माजी महिला संघाचे प्रशिक्षक वरकेरी वेंकट रमन (डब्ल्यूव्ही रमन) यांनी बीसीसीआयला बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी फलंदाजी सल्लागार म्हणून दिग्गज भारतीय क्रिकेट खेळाडू सचिन तेंडुलकरला ऑस्ट्रेलियाला पाठवण्याचा सल्ला दिला आहे. रामन म्हणाले की, तेंडुलकरच्या कौशल्याचा भारताला फायदा होऊ शकतो आणि दुसऱ्या कसोटीपूर्वी पुरेसा वेळ दिल्यास त्याचा सहभाग प्रभावी होऊ शकतो.