गोरक्षा समितीची लवकरच स्थापना करण्यात येणार…
जनशक्तीचा दबाव न्यूज | निलेश जाधव / देवरूख | सप्टेंबर ०७, २०२३.
संंगमेश्वर तालुक्यातून राजरोसपणे अवैधरित्या गुरांची वाहतुक होत असल्याचे निदर्शनास येत आहे. या वाहतुकीला वेळीच आळा घालणे गरजेचे आहे. अवैधरित्या गुरांच्या वाहतुकीला चाप बसावा यासाठी गोरक्षा समितीची लवकरच स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे युवामोर्चा जिल्हा उपाध्यक्ष रूपेश कदम यांनी देवरूख येथे पत्रकार परिषदेत दिली आहे.
देवरूख येथील भाजपच्या कार्यालयात संंगमेश्वर तालुका भाजपच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना रूपेश कदम म्हणाले कि, गेले काही दिवस तालुक्यातील देवरूख-बामणोली-कळकदरामार्गे अवैधरित्या गुरांची वाहतुक होत असल्याचे आपल्या निदर्शनास येत होते. याचवेळी सापळा रचून अवैधरित्या गुरांची वाहतुक करणाऱ्या गाड्या पकडण्याचे आपण ठरवले. यानुसार हातीव व मारळ येथे भाजप व शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून दोन गाड्या पकडण्यात आल्या. यावरून या मार्गावरून अवैधरित्या गुरांची वाहतुक होत असल्याचे सिध्द झाले आहे. या गाड्यांमध्ये गायींची संख्या अधिक होती, असे दिसून आले.
हिंदू संस्कृतीमध्ये गायीला अनन्य साधारण असे महत्व आहे. गायीला आपण गोमाता म्हणतो. तिची पूजा करतो. अशा गायीची जर का कत्तल करण्याच्या उद्देशाने अवैधरित्या वाहतुक होत असेल तर ही गंभीर बाब आहे. या प्रकाराला वेळीच आळा घातला नाही तर असे प्रकार राजरोसपणे सुरू राहतील. म्हणूनच अवैधरित्या गुरांच्या वाहतुकीला वेळीच चाप बसावा याकरिता गोरक्षा समितीची स्थापना करण्यात येणार असून या समितीमार्फत अवैधरित्या गुरांच्या वाहतुकीवर बारीक लक्ष ठेवले जाईल. वेळप्रसंगी अशाप्रकारची वाहतुक होणारच नाही यावर भर दिला जाईल, जेणेकरून गायींना कत्तल करण्याच्या उद्देशाने नेण्यापासून वाचवले जाईल, असे रूपेश कदम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
कळकदरा हे ठिकाण रत्नागिरी जिल्ह्याचे नाक समजले जाते. मात्र येथे चेकनाका नसल्यामुळे देवरूख-बामणोली-कळकदरामार्गे अवैधरित्या गुरांची वाहतुक राजरोसपणे सुरू आहे. त्यामुळे मुर्शी येथे असणारा चेकनाका हलवून तो लवकरात लवकर कळकदरा येथे नेण्यात यावा, अशी आपली आग्रही मागणी असल्याचेही रूपेश कदम यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. अवैधरित्या गुरांची वाहतुक रोखण्यासाठी भाजपचा एक कार्यकर्ता म्हणून आपण कटीबध्द असून यापुढेही अवैधरित्या गुरांची होणारी वाहतुक रोखली जाईल, असेही रूपेश कदम यांनी बोलताना स्पष्ट केले आहे.
या पत्रकार परिषदेप्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव, अभिजीत शेट्ये, सुशांत मुळ्ये, विनोद म्हस्के, सचिन बांडागळे, प्रथमेश धामणस्कर, स्वप्नील शिंदे, संकेत कदम, महेश धामणस्कर, नागेश कदम, विजय गुरव, अनंत बांडागळे, सुधीर यशवंतराव, राहूल फाटक, संजय इंदुलकर, महेंद्र आंबेकर, रूपेश भागवत, मनिष सावंत, राजू महाडिक, सुबोध लोध, प्रभंजन केळकर, अमोल गायकर, प्रणीत मालप, यशवंत गोपाळ, किशोर करंबेळे, संजय नटे, संकेत इंदुलकर, सुमित मालप, बाबू मोरे, बाबू विंचू, प्रमोद शिंदे, दत्ता शिंदे तर शिंदे गटाचे देवरूख शहरप्रमुख सनी प्रसादे, प्रसाद सावंत, सचिन मांगले, नंदू देसाई, बाळा माने, शैलेश साडविलकर, हेमंत शिंदे, गुरू सप्रे, चेतन परकर आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.