
जळगाव- पुण्यातील वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर चहुबाजूंनी टीका होत आहे. काहींनी तर रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली. त्यातच आता सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये चाकणकर यांच्या एका समर्थक महिलेने एका सामान्य महिलेला फोन करून धमकावल्याचा आरोप होत आहे. ही क्लिप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी स्वतः त्यांच्या ट्विटर हँडलवरून शेअर करत संताप व्यक्त केला आहे.
या पोस्टमध्ये खडसे यांनी थेट आरोप करत म्हटले आहे की, “आता पद जातंय या भीतीने प्रचंड खळबळ उडाली आहे. त्यामुळे अध्यक्षा आता या पातळीवर येऊन पोहोचल्या आहेत. महिला आयोग अध्यक्षांविरोधात सोशल मीडियावर पोस्ट लिहिली म्हणून कार्यकर्त्यांना धमकवण्याच्या सुपाऱ्या दिल्या जात आहेत. महिलांना काय विरोध करण्याचीही मुभा राहिली नाही का?” असा सवालही रोहिणी खडसे यांनी सरकारला केला आहे.
राज्याला फुलटाईम महिला आयोग अध्यक्षा हव्या.
दरम्यान, रोहिणी खडसे यांनी राज्याला पार्ट नाही, तर फुलटाईम महिला आयोग अध्यक्ष हव्या, अशी मागणी केली होती. सध्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा ह्या त्यांच्या पक्षात एका प्रमुख पदावरही आहेत. त्यामुळे ही दुहेरी भूमिका बजावत असताना त्यांना महिला अत्याचारांच्या प्रकरणात वेळ मिळत नसावा, अशी टीका केली होती.
पक्षाच्या कामामुळे महिला आयोगाच्या पदावर अन्याय होता कामा नये, त्याचा फरक थेट महिलांवरील प्रश्नांवर पडेल. त्यामुळे आता राज्याला पार्ट टाईम नव्हे तर फुलटाईम महिला आयोग अध्यक्षा हव्या, अशी जनतेची भावना असल्याचे रोहिणी खडसे म्हणाल्या. महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्ष पदी एक स्वतंत्र व्यक्ती नेमावी, ज्याने करुन आयोगाचा कारभार सुरळीत चालेल, अशी मागणी रोहिणी खडसे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.