मुंबई : मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी साचलं असून काही ठिकाणी झाडंही कोसळली आहेत. बोरिवली परिसरातील मागाठणे मेट्रो स्टेशनजवळ काही भाग खचल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियावर या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. मुंबई महापालिकेने बिल्डरला तातडीने काम थांबवण्याचे आदेश दिले असून त्याच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
मागाठणे मेट्रो स्टेशनजवळील रस्ता खचत असल्याचा व्हिडिओ दोन दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मेट्रो स्टेशनजवळील मेट्रो मॉलच्या बाजूचा रस्ता खचण्यास सुरुवात झाली होती. या कारणामुळे एका बाजूची वाहतूक बंद करण्यात आली होती.