
संगमेश्वर :- मुसळधार पावसामुळे संगमेश्वर तालुक्यातील कुचांबे कोंडभैरव येथील महिपत दुडे यांच्या घरावर दरड कोसळली आहे. त्यांच्यासह तीन घरातील लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.
मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात दरडी खाली येण्याचे प्रमाण वाढले असून, कुचांबे येथील दुडे यांच्या घरावर दरड कोसळल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावातील ज्येष्ठ कार्यकर्ते श्याम काजवे, काशीराम लाखन, चंद्रकांत कदम, आत्माराम भोमकर, दिनेश राक्षे, सुहास पंडव, तुकाराम बागवे, सुनील लाखन यांनी दरड हटवण्याचे काम हाती घेतले आहे. या ठिकाणी एकूण तीन घरांचे स्थलांतर करण्यात आलेले आहे.
तालुक्यातील शेनवडे येथील सरपंच दत्ताराम लाखन यांच्यासह आसपासच्या घरामध्ये नदीचे पाणी घुसल्याने घरांना धोका निर्माण झाला आहे. तसेच गाड्यांचे आणि घरांचे नुकसान झाले आहे. चिखली येथे बाबू मयेकर यांच्या घरातील पोस्ट ऑफिसमध्येही पाणी घुसले आहे. कडवई चिखली रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडला असल्याचा आरोप केला जात आहे.
मुंबई गोवा महामार्गावर तुरळ येथेही संरक्षण भिंत कोसळल्याने रिक्षा स्टँडसह विद्युत वाहिनीलाही धोका निर्माण झाला आहे. नायब तहसीलदार गोताड यांच्या सूचनेनंतर ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम सुरू आहे. तसेच पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.