जनशक्तीचा दबाव न्यूज | रत्नागिरी | फेब्रुवारी ०५, २०२३.
हवामानातील बदलांमुळे आंबा पिकावर परिणाम झाला आहे. गेले चार-पाच दिवसांपासून हवामानात पुन्हा बदल झाला आहे. थंडी गायब झाली असून, दिवसा कडाक्याचे ऊन पडत आहे. थंडी नसल्याने आता कुठे सुरू झालेली मोहोर प्रक्रिया थांबण्याचा धोका आहे.
यावर्षी एकूणच आंबा उत्पादन अत्यल्प आहे. पावसाळ्यात झाडांना आलेला मोहोर कीडरोगापासून वाचविण्यात ज्या शेतकऱ्यांना यश आले आहे, त्या झाडांचा आंबा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून बाजारात येण्याची शक्यता आहे, मात्र त्याचे प्रमाण किरकोळ असेल. यावर्षी पालवीचे प्रमाण सर्वाधिक राहिले आहे. पहिल्या टप्प्यात काही झाडांना मोहोर आला, परंतु हे प्रमाण अवघे दहा टक्के होते. त्यातही कीडरोग, बुरशी, तुडतुडा, थ्रीप्सचा प्रादुर्भाव वेळोवेळी झाला. काही बागायतदारांनी कीटकनाशकांची फवारणी करून मोहोर व झालेली फळधारणा वाचवली आहे.
हा आंबा दुसऱ्या टप्प्यात २० मार्चनंतरच बाजारात येणार आहे. दि. २० मार्च ते १५ एप्रिलपर्यंत हा आंबा बाजारात येईल, त्यानंतर मात्र बाजारात हापूसचा तुटवडा भासेल. एकूणच हवामानातील बदलांमुळे दुसऱ्या टप्प्यात मोहोर प्रक्रिया झालीच नाही. त्यामुळे बागायतदारांसाठी हे फार मोठे संकट आहे.मागच्या दोन आठवड्यांत कडाक्याच्या थंडीमुळे मोहोर प्रक्रिया किरकोळ प्रमाणात सुरू झाली होती. परंतु गेल्या चार दिवसांपासून पुन्हा थंडी गायब झाली आहे. पहाटे थोडाफार गारवा असला, तरी दिवसा मात्र कडकडीत ऊन आहे. या उष्म्यामुळे आता मोहोर प्रक्रिया पुन्हा थांबून पुन्हा कलमे पालवीकडे वर्ग होण्याचा धोका आहे.
सध्याच्या मोहोरावर थ्रीप्सचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यापासून वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना फवारणी करावी लागत आहे. उष्मा कमी होऊन थंडी कायम असेल, तर तो आंबा १० मे नंतरच बाजारात येईल. त्यामुळे फेब्रुवारीनंतरच आंबा हंगामाचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. आंबा उत्पादन दिवसेंदिवस खालावल्याने शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे. खत व्यवस्थापनापासून आंबा बाजारात येईपर्यंत मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना खर्च करावा लागतो. तुलनेने अपेक्षित दर प्राप्त होत नसल्याने बागायतदारांची आर्थिक गणिते मात्र विस्कटत आहेत.