
संगमेश्वर : अर्चिता कोकाटे/ नावडी- संगमेश्वर मधील नावडी पोस्ट आळी येथे राहणारे प्रसिद्ध चित्रकार श्री. ऋषिकांत भिकाजी शिवलकर हे आपल्या जीवनात हर उन्नरी कलाकार, पेंटर तसेच चित्रकार, मूर्तिकार ठरले.
सन 1970 साली त्यांनी आपल्या पेंटिंगच्या कामाला सुरुवात केली. गावात त्यावेळी हाताच्या बोटावर मोजता येतील असे दोन ते तीन पेंटर होते. बोर्ड पेंटिंग, वॉलपीस, चार ते पाच फूट उंचीची देवी देवतांची तसेच साधुसंतांची चित्रे रेखाटन व रंगकला ते बोलता बोलता सहजपणे करत असत तसेच विविध उत्सवाच्या वेळी गावच्या होणाऱ्या नाटकात ” पांडू हवालदार “, ” दादा कोंडके” यासारख्या भूमिका व रंजक अभिनय ते त्याकाळी बजावत असत.


पेंटिंगकले बरोबरच जोड व्यवसाय म्हणून गणपती कारखान्याची संकल्पना त्यांनी सुरुवातीस आपला आपल्या चित्र शाळेत ११ छोटे गणपती काढून सन 1984 साली आरंभ केला. पत्नी कै. सौ. स्मिता व मोठ्या दोन मुलींची साथ त्यांना त्या काळात उत्तम लाभली. त्यानंतर मुलगा मंदार व तुषार हे देखील वडिलांची कला पाहून पाहून शिकत होते. काही वर्षानंतर रंग कला पाहून व कलाकुसर पाहून गणपतीची संख्या 210 पर्यंत पोहोचली.

वृद्धापकाळमुळे श्री. ऋषिकांत शिवलकर सध्या घरी विश्रांती घेत आहेत. कलारत्न म्हणून सन्मान चिन्ह देऊन गावातील सामाजिक मंडळांनी 2021 साली सन्मानित केले आहे. सध्या शिक्षकी पेशा सांभाळून चित्रकार मंदार व तुषार हे दोन्ही भाऊ ग्राहकांच्या पसंतीप्रमाणे 280 रेखीव गणेश मूर्ती काढतात. एक फूट ते पाच फूट मूर्ती सध्या चित्र शाळेत आहेत. बाल गणेश मूर्ती विविध वरायटीमध्ये शोकेसमध्ये ठेवण्यासाठी बाराही महिने विकल्या जातात. वैशिष्ट्य म्हणजे शाडू माती बरोबरच लाल माती पासून चे गणपती येथे
पहावयास मिळतात.
यावर्षी एक जूनला माती कामास आरंभ झाला व 2 जुलैपासून रंग कामात सुरुवात केली गेली आहे. सध्या कारखान्यात रंगकामाची लगबग सुरू आहे. रत्नागिरी, फुनगुस, पिरंदवणे, अंतरवली, करंबेळे, तसेच संगमेश्वर पंचक्रोशी तील भक्त गणपती नेत असतात.
यावर्षी दरात दहा टक्क्यांनी वाढ होऊन सुद्धा ग्राहकांची मागणी मात्र वाढत आहे.यातूनच कोकणात गणेश कलेचा अविष्कार दिसून येतो व या कलेचे संवर्धन होताना दिसून येत आहे. श्री. ऋषिकांत शिवलकर यांना त्यांच्या पत्नी कै. सौ. स्मिता यांचीही रंगकामात व गणपतीच्या कामामध्ये खूप साथ लाभलेली आहे.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर