भारत पाकिस्तान हा टी-२० विश्वचषकातील सामना फारच अटीतटीचा झाला. पण अखेरीस भारताने विजय मिळवला.
भारताचा पाकिस्तानवर चित्तथरारक विजय
ड्रॉप इन पिच, न्यूयॉर्कचं बेसबॉलचं मैदान, सूर्य आणि ढगांचा लपंडाव या सगळ्यात पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांचं आव्हान मोडून काढत भारतीय संघाने ट्वेन्टी२० वर्ल्डकप स्पर्धेत ६ धावांनी अफलातून विजय नोंदवला. भारतीय वेळेनुसार रविवारी रात्री ८ वाजता सुरू झालेला हा सामना मध्यरात्र उलटल्यानंतरच संपला. ऋषभ पंतने साकारलेली ४२ धावांची खेळी, तीन भन्नाट झेल आणि जसप्रीत बुमराहने शिस्तबद्ध माऱ्यासह पटकावलेल्या ३ विकेट्स या विजयाचं वैशिष्ट्य ठरल्या. पाकिस्तानविरूद्धच्या या विजयासह भारताचे २ सामन्यात ४ गुण झाले आहेत. सुपर८ साठी ते आगेकूच करत आहेत. मात्र पाकिस्तानसाठी हा पराभव स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणणारा ठरू शकतो.
भारतीय गोलंदाजांच्या अखेरच्या षटकांतील भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने रोमहर्षक विजय मिळवला आहे. टी-२० विश्वचषक २०२४ मधील भारत-पाकिस्तानच्या हायव्होल्टेज सामन्यात भारताच्या उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन पाहायला मिळाले. न्यूयॉर्कमधील फलंदाजीसाठी अवघड असलेल्या नासाऊ काऊंटी क्रिकेट स्टेडियमच्या खेळपट्टीवर तगडी फलंदाजी फळी असलेला भारतीय संघ ११९ धावांवर ऑल आऊट झाला. बुमराहच्या १५व्या षटकापासून गोलंदाजांनी पाकिस्तानला एकही मोठा फटका खेळण्याची संधी दिली नाही. तर बुमराहने १९व्या षटकात इफ्तिखार अहमदची विकेट घेत पाकिस्तान संघावर मोठा दवाब टाकला. तर अखेरच्या षटकात अर्शदीप सिंगनेही विकेट घेतली. पावसाने व्यत्यय आणूनही भारत पाकिस्तान सामना हा चाहत्यांसाठी पुन्हा एकदा मोठी पर्वणी ठरली. अवघ्या ११९ धावांच्या लक्ष्याचा बचाव करत भारतीय संघाने पाकिस्तानविरूद्ध चित्तथरारक विजय मिळवला आहे.
टी-20 वर्ल्डकप २०२४ चा १९वा सामना आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६ धावांनी पराभव केला.
टी-20 वर्ल्डकप २०२४ चा सर्वात मोठा सामना आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर भारतीय गोलंदाजांनी चमत्कार केला. प्रथम फलंदाजी करून टीम इंडियाने केवळ ११९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ केवळ ११३ धावा करू शकला.
न्यूयॉर्कच्या नासाऊ इंटरनॅशनल स्टेडियमवर भारतीय गोलंदाजांनी करिष्माई कामगिरी करत 6 धावांनी विजय मिळवला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या रोहित सेनेला केवळ ११९ धावा करता आल्या.
प्रत्युत्तरात पाकिस्तानची धावसंख्या १३व्या षटकात २ बाद ७३ धावांपर्यंत पोहोचली होती. असे असतानाही भारतीय गोलंदाजांनी डाव फिरवला. १२० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ केवळ ११३ धावा करू शकला. भारताकडून जसप्रीत बुमराहने २ आणि हार्दिक पांड्याने २ बळी घेतले.
भारत वि. पाकिस्तान क्रिकेट स्कोअर-
६ चेंडूत १८ धावांची गरज-
१९ षटकांनंतर पाकिस्तानची धावसंख्या ६ विकेटवर १०२ धावा आहे. आता पाकिस्तानला विजयासाठी ६ चेंडूत १८ धावा करायच्या आहेत, जे जवळपास अशक्य आहे. भारतीय गोलंदाजांनी चमत्कार केला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
बुमराहने रिझवानला क्लीन बोल्ड केले-
पाकिस्तानला ८० धावांवर चौथा धक्का बसला. १५व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर बुमराहने रिझवानला क्लीन बोल्ड केले. तो ४४ चेंडूत ३१ धावा करून बाद झाला. सध्या शादाब खान आणि इमाद वसीम क्रीजवर आहेत.
पाकिस्तानची तिसरी विकेट पडली-
७३ धावांवर पाकिस्तानची तिसरी विकेट पडली. १३व्या षटकात हार्दिक पांड्याने फखर जमानला विकेटच्या मागे झेलबाद केले. फखर ८ चेंडूत १३ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. ऋषभ पंतने त्याचा झेल घेतला. पाकिस्तानला विजयासाठी ४२ चेंडूत ४७ धावांची गरज आहे.
बाबर आझम बाद-
पाकिस्तानने पाचव्या षटकात पहिली विकेट गमावली आहे. जसप्रीत बुमराहने बाबर आझमला स्लिपमध्ये झेलबाद केले. बाबर १० चेंडूत १३ धावा करून बाद झाला. पाकिस्तानला अजूनही ९० चेंडूत विजयासाठी ९४ धावा करायच्या आहेत. पाकिस्तानच्या ५ षटकात २६ धावा झाल्या आहेत.
भारताच्या ११९ धावा-
भारतीय संघ १९ षटकांत ११९ धावांत गारद झाला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाची फलंदाजी खूपच खराब झाली. टॉप ऑर्डर, मिडल ऑर्डर, सर्वकाही अपयशी ठरले. शेवटच्या षटकात शेपटीच्या फलंदाजांच्या काही धावांमुळे भारताला ११९ धावांपर्यंत मजल मारता आली.
रोहित शर्मा १३ धावा, विराट कोहली ४ धावा, अक्षर पटेल २० धावा, सूर्यकुमार यादव ७ धावा, शिवम दुबे ३ धावा करून बाद झाला, हार्दिक पंड्या ७ धावा करून बाद झाला. रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह यांना खातेही उघडता आले नाही.
त्याचवेळी अर्शदीप सिंग ९ धावा करून धावबाद झाला. सिराज ७ धावा करून नाबाद राहिला.
भारताकडून ऋषभ पंतने सर्वाधिक ४२ धावा केल्या. त्याने ३१ चेंडूत ६ चौकार मारले. पाकिस्तानकडून नसीम शाह आणि हरिस रौफ यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. तर मोहम्मद आमिरने २ विकेट घेतल्या. शाहीन आफ्रिदीला एक विकेट मिळाली.
ऋषभ पंतने सलग ३ चौकार मारले-
१०व्या षटकात ऋषभ पंतने हरिस रौफवर सलग ३ चौकार मारले. या षटकात एकूण १३ धावा आल्या. १० षटकांनंतर टीम इंडियाची धावसंख्या ३ विकेटवर ८१ धावा आहे. ऋषभ पंतने २४ चेंडूत ५ चौकारांच्या मदतीने ३४ धावा केल्या आहेत. तर सूर्यकुमार यादव ४ चेंडूत एक चौकारासह ५ धावांवर खेळत आहे.
पाचव्या षटकात एकूण १४ धावा-
पाचव्या षटकात एकूण १४ धावा आल्या. शाहीन आफ्रिदीच्या या षटकात अक्षर पटेलने एक षटकार आणि १ चौकार लगावला. ५ षटकांनंतर टीम इंडियाची धावसंख्या २ विकेटवर ३८ धावा आहे. अक्षर पटेल १० चेंडूत १४ धावांवर खेळत आहे. ऋषभ पंत ५ चेंडूत ४ धावांवर खेळत आहे.
भारताला दुसरा धक्का-
१९ धावांवर भारताला दुसरा धक्का बसला. विराट कोहली ४ धावा करून बाद झाला. यानंतर तिसऱ्या षटकात शाहीन आफ्रिदीने रोहित शर्माला हरिस रौफकडे झेलबाद करून मोठा धक्का दिला. रोहित १३ धावा करू शकला. सध्या ऋषभ पंत आणि अक्षर पटेल क्रीजवर आहेत. तीन षटकांनंतर भारताची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात २० धावा आहे.
विराट बाद-
दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर विराट कोहलीने शानदार कव्हर ड्राईव्ह मारला. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर नसीम शाहने त्याला झेलबाद केले. टीम इंडियाने १२ धावांवर पहिली विकेट गमावली आहे.
भारताची धमाकेदार सुरूवात-
पाकिस्तानसाठी शाहीन आफ्रिदीने पहिले षटक टाकले. या षटकाच्या पहिल्या चेंडूवर दुहेरी धाव आली. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर रोहितने शानदार षटकार ठोकला. पहिल्या षटकात ८ धावा आल्या
पाकिस्तानने टॉस जिंकला..
पाकिस्तानने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. बाबर म्हणाला की ढगाळ स्थिती आहे आणि त्यांचे ४ वेगवान गोलंदाज त्याचा फायदा घेऊ इच्छितात. कर्णधार बाबरने प्लेइंग-११ मध्ये एक बदल केला आहे. इमाद वसीम परतला आहे. आझम खान याला वगळण्यात आले आहे.
त्याचवेळी भारतीय कर्णधार रोहित शर्मानेही नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असता असे सांगितले. रोहितने प्लेइंग-११ मध्ये कोणताही बदल केलेला नाही.
पाऊस थांबला, आता काही वेळात नाणेफेक…
चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. न्यूयॉर्कमध्ये सध्या पाऊस थांबला आहे. आता या सामन्याचा नाणेफेक काही वेळात होईल. मात्र, खेळपट्टी अजूनही कव्हर्सने झाकलेली आहे.
पावसामुळे टॉस उशिराने…
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावर संकटाचे ढग दाटले आहेत. पावसामुळे या सामन्याच्या नाणेफेकीला विलंब होऊ शकतो. आत्तापर्यंत, खेळपट्टी झाकली गेली आहे. न्यूयॉर्कमध्ये ७ वाजण्याच्या सुमारास पाऊस सुरू झाल्याची माहिती मिळाली आहे.
अक्षर पटेलच्या जागी कुलदीप प्लेइंग इलेव्हनमध्ये?..
रोहित शर्मा आज टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल करू शकतो. कुलदीप यादवची पाकिस्तानविरुद्धची कामगिरी लक्षात घेता त्याचा आज अंतिम अकरामध्ये समावेश केला जाऊ शकतो. अक्षर पटेलच्या जागी कुलदीप यादव प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील होऊ शकतो.
भारतीय संघ किती बदलला?…
ऑस्ट्रेलियात झालेल्या गेल्या टी-20 विश्वचषक संघातील ७ खेळाडूंना यावेळी भारतीय संघात स्थान मिळालेले नाही. गेल्या वेळी ऋषभ पंतसोबत यष्टीरक्षक म्हणून समाविष्ट करण्यात आलेल्या दिनेश कार्तिक आणि केएल राहुलचा यावेळी संघात समावेश करण्यात आलेला नाही.
विशेष म्हणजे यावेळी भारतीय संघात ४ फिरकीपटूंना संधी मिळाली आहे. तर सर्वात अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन निवडकर्त्यांचा विश्वास जिंकण्यात अपयशी ठरला.
राहुलप्रमाणेच अश्विनही मागच्या वेळी संघाचा भाग होता. राहुल आणि अश्विन व्यतिरिक्त दीपक हुडा, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि मोहम्मद शमी या खेळाडूंना यावेळी संघात संधी मिळाली नाही. हे ५ खेळाडू २०२२ च्या T20 विश्वचषक संघाचा भाग होते.
२०२२ च्या टी-20 वर्ल्डकपमधील भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), दिनेश कार्तिक, विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, रविचंद्रन अश्विन, दीपक हुडा, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, हर्षल पटेल आणि जसप्रीत बुमराह.
टी-20 २०२४ विश्वचषकासाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद बुमराह. सिराज.
भारत-पाकिस्तान हवामान
न्यूयॉर्कमध्ये आज रविवारचा दिवस अल्हाददायी असेल. पण पावसाची शक्यता आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होईल. जर पाऊस पडला तर खेळाला विलंब होऊ शकतो. नाणेफेकीपूर्वी पाऊस पडल्यास सामना उशीराने सुरू होऊ शकतो.
हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार, नाणेफेकीच्या वेळी ४० ते ५०% पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि, दुपारी १ वाजता पावसाची शक्यता १०% पर्यंत कमी होईल, परंतु दुपारी ३ वाजता पुन्हा ४०% पर्यंत पोहोचू शकेल.
दोन्ही संभाव्या प्लेइंग इलेव्हन-
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज.
पाकिस्तान: बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), उस्मान खान, फखर जमान, आझम खान, इफ्तिखार अहमद, शादाब खान/सायम अयुब, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, मोहम्मद अमीर, हरिस रौफ.