देवरूख- देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयात माहिती अधिकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रभारी तहसीलदार समर्थ क्षीरसागर उपस्थित होते.
या दिनाच्या शुभेच्छा देताना प्रभारी तहसीलदार श्री. क्षीरसागर यांनी माहितीच्या अधिकाराचे महत्त्व पटवून दिले. तसेच शासन यंत्रणेतील व्यवहारात पारदर्शकता, भ्रष्टाचाराचे समूळ निर्मूलन, प्रशासकीय कार्यपद्धती, नियम याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाप्रसंगी नायब तहसीलदार जयविजय पंडित व त्यांचे सहकारी, त्याचबरोबर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. मोहन लुंगसे व सर्व प्राध्यापक वृंद उपस्थित होते.
महाविद्यालयातील समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. विकास शृंगारे यांचे ‘माहिती अधिकार – एक संकल्पना’ या विषयावरील व्याख्यान संपन्न झाले. या व्याख्यानातंर्गत माहिती अधिकाराची संकल्पना व माहिती अधिकारामुळे सामान्य नागरिकांना प्राप्त झालेल्या अधिकारांची माहिती त्यांनी दिली. या दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयात कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ‘माहिती अधिकार’ या विषयावर पोस्टर स्पर्धा घेण्यात आली. प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी माहितीचा अधिकार हा सर्वांसाठी उपयुक्त असून, सर्व विद्यार्थ्यांनी सखोल अभ्यासाच्या साह्याने तो जाणून घेऊन आपल्या कुटुंबासह समाजापर्यंत पोहोचवावा असे आवाहन याप्रसंगी केले. महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाच्यावतीने ‘माहितीचा अधिकार व भारतीय संविधान’ यासंबंधीची माहिती देणाऱ्या ग्रंथांचे प्रदर्शन ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे आणि सहाय्यक रोशन गोरुले यांनी भरविले होते.
विद्यार्थ्यांसाठी ‘माहिती अधिकार अधिनियम २००५’ या संदर्भातील व्हिडिओही यावेळी प्रदर्शित करण्यात आला. माहिती अधिकार या विषयावर विद्यार्थिनी कु. दीक्षा शृंगारे हिने सुबक रांगोळीच्या माध्यमातून जनजागृती केली. या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे, प्रा. मयुरेश राणे, प्रा. अभिनय पातेरे, प्रा. शिवराज कांबळे, प्रा. देवयानी जोशी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. प्रवीण जोशी यांनी केले. तर संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. सीमा शेट्ये यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
फोटो- ग्रंथालयात आयोजित करण्यात आलेले ग्रंथ प्रदर्शन व पोस्टर्स स्पर्धेत सहभागी झालेले विद्यार्थी आयोजक प्राध्यापक वर्गासह.