भाड्यावरून वाद घालणाऱ्या प्रवाशाची रिक्षाचालकानं चाकूनं भोसकून केली हत्या; दुसरा प्रवासी ICU मध्ये!

Spread the love

बंगळुरू- प्रवासी वाहतूक व्यवस्थेच्या माध्यमातून दररोज असंख्य नागरिक प्रवास करत असतात. रिक्षा, बस, लोकल, खासगी प्रवासी वाहने अशा अनेक माध्यमांचा त्यात समावेश आहे. अशावेळी प्रवाशांचे चालकांशी होणारे वाद ही तर आता नित्याचीच बाब ठरली आहे. मग ते बसचालक असोत किंवा रिक्षाचालक. हे वाद बसण्यावरून होऊ शकतात, सुट्या पैशांवरून होऊ शकतात किंवा निश्चित ठिकाणी बस वा रिक्षा न थांबवल्यावरून होऊ शकतात. अनेकदा या वादाचं किंवा बाचाबाचीचं पर्यवसान हाणामारीत झाल्याचंही समोर आलं आहे. मात्र, बंगळुरूमध्ये एका रिक्षाचालकानं भाड्यावरून वाद घालणाऱ्या प्रवाशाची चाकूनं भोसकून हत्या केल्याचा प्रकार समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?
बंगळुरूच्या यशवंतपूर रेल्वे स्थानकावर हा प्रकार घडला. दोन प्रवासी एका रिक्षातून मॅजेस्टिकवरून यशवंतपूर रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी निघाले. ते रेल्वेस्थानकावर पोहोचले, तेव्हा रिक्षाचालकानं ठरल्यापेक्षा जास्त पैसे देण्याची मागणी केली. त्यामुळे त्यांच्यात वाद सुरू झाला. वादाचं रुपांतर पुढे बाचाबाची आणि हाणामारीपर्यंत झालं. यामुळे रागाच्या भरात रिक्षाचालकानं दोन्ही प्रवाशांना चाकूने भोसकलं.

या घटनेत दोन्ही प्रवासी गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी घटनास्थळावरून नेण्यात आलं. मात्र, त्यातील एका व्यक्तीचा वाटेतच मृत्यू झाला, तर दुसऱ्या भावावर रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये उपचार चालू आहेत. मृत्यू झालल्या प्रवाशाचं नाव अहमद असून गंभीर जखमी झालेल्या त्याच्या भावाचं नाव अयूब आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाबाबत कळताच तातडीने तपास सुरू करण्यात आला. जखमी अयूबकडून मिळालेली माहिती आणि त्या परिसरातील सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने आरोपी रिक्षाचालकाची ओळख पटली असून त्याला अठकही करण्यात आलं आहे. पुढील तपास सुरू असून आरोपीची चौकशी केली जात आहे. आरोपी रिक्षाचालकावर याआधीही हसन जिल्ह्यात अशाच प्रकारच्या काही गुन्ह्यांचे खटले प्रलंबित आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page