ठाणे : मुरबाड तालुक्यातील मनसेचे तालुकाध्यक्ष कैलास चौधरी, शहराध्यक्ष नरेश देसले यांच्यासह तालुका सचिव, सह तालुका सचिव, सात तालुका उपाध्यक्ष शहर सचिव, सर्व शहर संघटक, अकरा विभाग अध्यक्ष, 22 उपविभाग अध्यक्ष, 55 शाखा अध्यक्ष यांनी वरिष्ठांच्या गटबाजीच्या अंतर्गत राजकारणाला कंटाळून आपल्या पदांचे राजीनामे दिले असल्याने तालुक्यांतील मनसेचे अस्तीत्व नव्याने बांधण्याची जबाबदारी पक्षाच्या वरिष्ठांवर आली आहे. नुकताच 9 मार्च रोजी मनसेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला आणि दुसऱ्याच दिवशी मुरबाड मनसेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांच्या मनमानी अंतर्गत गटबाजीला कंटाळून आपल्या पदांचे राजीनामे दिल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. मुरबाड शहर आणि तालुक्यात मनसेने आपल्या आंदोलनातून विरोधी पक्षाची ताकद दाखवली होती. मात्र वरीष्ठ पातळी व गावपातळीवर वर होणाऱ्या राजकीय घटना पहाता स्थानिकांना वरीष्ठ पातळी पातळीवरून कुठलेही सहकार्य मिळत नसल्याचे तालुकाध्यक्ष कैलास चौधरी यांनी सांगितले. तर पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मुरबाड तालुका संपुर्ण कार्यकरणीचे राजीनामे पक्ष अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांना ईमेल द्वारे पाठविण्यात आले असल्याची माहिती ही त्यांनी दिली. तर तालुका अध्यक्ष, तालुका सचिव, तालुका सह सचिव, 7 तालुका उपाध्यक्ष, शहर अध्यक्ष, शहर सचिव, सर्व शहर संघटक, 11 विभाग अध्यक्ष . 22 उपविभाग अध्यक्ष, 55 शाखा अध्यक्ष यांच्या सामूहिक राजीनाम्याचे पत्र पाठविण्यात आले. असल्याचे शहराध्यक्ष नरेश देसले यांनी ही दुजोरा दिला आहे.