संगमेश्वर/ प्रतिनिधी- संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी, कसबा संचलित, न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, कसबा-संगमेश्वर या विद्यालयामध्ये भारतीय प्रजासत्ताकाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
देशभक्तिगीत व घोषणांमुळे संपूर्ण परिसर देशभक्तिमय झालेले होते. अशा देशभक्तीपूर्ण वातावरणात संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष श्री नियाज कापडी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी विद्यालय परिसर आकर्षक पध्दतीने सजविण्यात आले होते.
ध्वजारोहण कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर यांना विद्यालयातील एमसीसी पथकाने मानवंदना देऊन ध्वजारोहण कार्यक्रम स्थळी आमंत्रित केले व ध्वजारोहण संपन्न झाल्यानंतर बासरीच्या सहाय्याने सुमधुर स्वरात राष्ट्रगीत वाजवण्यात आले. त्यानंतर राज्यगीत, संविधानाचे वाचन, ध्वज प्रतिज्ञा, झेंडा गीत आणि हिंद देश का प्यारा झेंडा सादर करण्यात आले.
ध्वजारोहण कार्यक्रमासाठी उपस्थित संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी, सदस्य, पालक व ग्रामस्थ यांचे विद्यालयाच्या वतीने स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते कसबा हायस्कूलच्या मराठी व इंग्रजी माध्यमातील विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षा, खेळ यामध्ये सहभागी होऊन उत्तम यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे प्रशस्तीपत्र, रोख पारितोषिक व चषक देऊन गौरविण्यात आले.
शासन परिपत्रकानुसार 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळा स्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले होते. त्यातीलच एक सांस्कृतिक कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यालयाच्या भव्य रंगमंचावर दोन्ही माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट अशा देशभक्तीपर गीतांवर नृत्याविष्कार सादर करून उपस्थितितांची वाहवा मिळवली.
प्रजासत्ताक दिनी भव्य अशी प्रभात फेरी काढण्यात आली. यामध्ये लेझीम पथक, झांज पथक, एमसीसी संचलन, विविध महापुरुषांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी, कॉपीमुक्त अभियानाच्या प्रचार प्रसारासाठी कॉपीमुक्त घोषणांचे फलक घेऊन जाणारे विद्यार्थी, आकर्षक ग्रंथदिंडी आणि गगनभेदी घोषणांच्या सहाय्याने ही प्रभात फेरी संपूर्ण कसबा गावातून काढण्यात आली.
प्रभात फेरी विद्यालयात आल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने चविष्ट अशी भेळ देण्यात आली. त्यानंतर प्रजासत्ताक दिनानिमित्त कविता गायन स्पर्धा, देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा व चित्रकला अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यात सहभागी विद्यार्थ्यांमधून गुणानुक्रमे तीन क्रमांक काढून त्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली.
संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन मराठी माध्यमाच्या प्राचार्या सौ. एल एन मणेर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
प्रजासत्ताक दिनाच्या या समारंभासाठी संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष श्री नियाज कापडी, उपाध्यक्ष श्री इब्राहिम काझी, सचिव श्री सईद उपाद्ये, खजिनदार श्री शिकुर गैबी, इतर सदस्य, विद्यालयाच्या प्राचार्या सौ. एल एन मणेर, पर्यवेक्षक श्री एस ए पटेल, इंग्रजी माध्यम मुख्याध्यापिका श्रीमती ए एम जुवळे, प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका श्रीमती गुलशन बेग, पत्रकार श्री वहाब दळवी, ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विद्यालयातील शिक्षक श्री यु टी गावडे यांनी केले.