नवी दिल्ली, 8 मे 2023- १९५० मध्ये भारताने पहिला प्रजासत्ताक दिन ध्यानचंद स्टेडिअममध्ये साजरा केला होता. तेव्हापासून राजधानीतल्या राजपथावर याचे संचलन व्हायला सुरुवात झाली. या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीत सादर केल्या जाणाऱ्या प्रदर्शनाची देशभरातील सर्व नागरिक आतुरतेने वाट पाहात असतात.
मागच्या वर्षीचा प्रजासत्ताक दिवस इतर वर्षांच्या तुलनेत विशेष होता. या वर्षी १४४ जवानांच्या संचलन तुकडीचे नेतृत्व एका महिला अधिकाऱ्याने केले होते. २०२४ ला होणाऱ्या संपूर्ण कार्यक्रमाचे संचलन, सादरीकरण महिला करणार असल्याची माहिती संरक्षण विभागातील सूत्रांकडून मिळाली आहे.
२०२४ मध्ये भारत ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. हा प्रजासत्ताक दिवस कर्तव्यपथावर साजरा करण्यात येणार आहे. त्या कार्यक्रमाची मध्यवर्ती संकल्पना ‘नारी शक्ती’ असण्याची संभावना आहे. त्यामुळे पुढील वर्षीच्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावरील संचलनात फक्त महिला पथके सहभागी व्हावीत असा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे.
फेब्रुवारीच्या सुरुवातीला संरक्षण सचिवांच्या अध्यक्षतेखाली या संबंधी विचार करण्यासाठी एका बैठकीचे नियोजन करण्यात आले होते. बैठकीत ठरलेल्या मुद्यांनुसार संरक्षण दलाच्या तिन्ही दलांना, विविध मंत्रालयांना तसेच विभागांना पत्र पाठवण्यात आले. त्यानुसार २०२४ च्या संचलनात फक्त महिलांची पथके, बॅण्ड, सादरीकरण आणि चित्ररथ असावे असे पत्रात नमूद करण्यात आले. अद्याप या संबंधी कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. तरीही लवकरच निर्णय घेण्यात येईल.