चिपळूण : महापुरात खचलेल्या गोवळकोट-पेठमाप येथील वाशिष्ठी नदीवरील एन्रॉन पुलाच्या दुरूस्तीचे काम अजूनही रखडले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदाराला तातडीने काम सुरू करण्याचे आदेश दिल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी पेठमाप येथील अंतर्गत रस्त्यावर वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून वाहतूक कोंडीमुळे स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत.
२२ जुलै २०२१ च्या अतिवृष्टी व महापुरात एन्रॉन पूल मध्यवर्ती भागात खचला. त्यानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून आणि कोणतीही दुर्घटना घडू नये, याची खबरदारी घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने हा पूल वाहतुकीसाठी बंद केला. मात्र हा पुल वाहतुकीसाठी बंद केल्याने प्रवासी वर्गासह स्थानिक नागरिक आणि लोटे एमआयडीसीकडे जाणार्या कामगारांचीही मोठी गैरसोय होत आहे.