- शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदेंची लोकसभेत मागणी
नवी दिल्ली – दिल्लीतील ‘शिवाजी स्टेडियम मेट्रो स्टेशन’ आणि शिवाजी ब्रिज रेल्वे स्थानक यांच्या नावात छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख असल्याने ही नावे बदलून त्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज’ असा पूर्ण उल्लेख व्हावा, अशी मागणी शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केली आहे. यावर केंद्र सरकारकडून लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल, असा विश्वासही खासदार डॉ. शिंदेंनी व्यक्त केला.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने दिल्लीतील ‘शिवाजी ब्रीज रेल्वे स्थानक’ आणि ‘शिवाजी स्टेडियम मेट्रो स्टेशन’ ही ठिकाणे ओळखली जातात. मात्र या दोन्ही नावांमध्ये छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख असल्याने ही नावे बदलून त्याजागी ‘छत्रपती शिवाजी महाराज’ असा पूर्ण उल्लेख करण्याची मागणी शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी लोकसभेत अधिवेशन नियम ३७७ अंतर्गत केली. ‘छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचाच नव्हे तर देशाचाही स्वाभिमान आहेत, त्यामुळे ज्याही वास्तूला महाराजांचे नाव देण्यात येईल, तिथे ते आदरानेच देण्यात यावे, या भावनेतून संसदेत ही मागणी केली आहे’, असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून केली होती. आजही शिवसेना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर आणि हिंदुत्वाच्या वाटेवर काम करण्याचा प्रयत्न आहे. याचाच एक भाग म्हणून आणि महाराजांप्रती आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून अधिवेशनात हा महत्वाचा विषय मांडल्याची प्रतिक्रिया खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. या मागणीबाबत केंद्र सरकारकडून लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
जाहिरात