
कोल्हापूर : वारणा नदी पूल ते घुणकी फाटा दरम्यानच्या रस्त्यावरील भराव काढून पिलर पध्दतीने उड्डाणपूल करावा, ही अशी मागणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे करुनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. सोमवारी संबंधित अधिकाऱ्यांना पुन्हा मागणीचे निवेदन देवू. मागणीचा विचार पंधरा दिवसांत न झाल्यास सहा पदरीकरणाचे काम बंद पाडण्याचा निर्णय घुणकी, किणी, चावरे, तळसंदे, पारगांव, निलेवाडी येथील शेतकऱ्यांनी घुणकी येथील राधाकृष्ण मंदिरात झालेल्या शेतकरी मेळाव्यात घेतला.
सातारा -कागल महामार्गाचे सहापदरीकरणाचे काम सुरु आहे. वारणा नदी पूल ते घुणकी फाटादरम्यान उड्डाणपूल व्हावा, अशी मागणी वर्षभरात अनेकदा शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांनी भेटून केली. खासदार धैर्यशील माने, आमदार डॉ. विनय कोरे, आमदार राजू आवळे यांनी अधिकाऱ्यांसह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला. दरम्यान, राष्ट्रीय प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी पाहणीही केली. पण कोणताही प्रतिसाद न दिल्याने शेतकरी, सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी राष्ट्रीय प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या कार्यपध्दतीविषयी संताप व्यक्त करण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुधीर मगदूम यांनी स्वागत केले. वारणेचे संचालक ॲड. एन. आर. पाटील, सुभाष जाधव, राजवर्धन मोहिते, प्रदीप देशमुख, प्रभाकर कुरणे, धोंडीराम सिद, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे, सुभाष भापकर, आनंदराव पाटील, अशोक जाधव, मल्हार सेनेचे जिल्हाध्यक्ष शहाजी सिद, जालिंदर जाधव यांनी घुणकी फाटा ते वारणा नदीपुलापर्यंत असलेल्या भरावामुळे शेतीच्या नुकसानीची माहिती दिली. अधिकाऱ्यांनी पाहणी करूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोपही केला.
यावेळी घुणकीचे उपसरपंच केशव कुरणे, निलेवाडीचे सरपंच माणिक घाटगे, उपसरपंच शहाजी बोरगे यांच्यासह किणी, घुणकी, चावरे, तळसंदे, पारगांव, निलेवाडी गावांतील सर्वपक्षीय कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.
जाहिरात


