जनशक्तीचा दबाव न्यूज | मुंबई | फेब्रुवारी ०२, २०२३.
वस्त्रोद्योग विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अजितकुमार सासवडे यांना लाचप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. त्यांच्याकडून ३० लाख रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती, मात्र १५ लाख रुपयांची लाच घेताना ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
यातील तक्रारदार कापड व्यापारी असून त्यांनी मालेगाव येथील दि पक्का रंग साडी को-ऑप असोशिएशन लिमिटेडमध्ये शेअर होल्डर होण्यासाठी शेअरची फी भरुन अर्ज केला होता, मात्र त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला होता. त्याविरोधात त्यांनी वस्त्रोद्योग विभागात अपिल दाखल केले होते. तसेच तक्रारदारासह इतर २० जणांनी मुंबई उच्च न्यायालयात एक रिट पिटीशन दाखल केले होते. या याचिकेवर सुनावणी देताना मुंबई उच्च न्यायालयाने वस्त्रोद्योग विभागाला संबंधित अर्ज निकाली काढण्याचे आदेश दिले होते. यासंदर्भात त्यांनी प्रादेशिक उपायुक्त अजितकुमार सासवडे यांची भेट घेतली होती. त्यांच्या बाजूने निकाल देण्यास संस्थेचा सभासद करुन घेण्यासाठी अजितकुमार यांनी त्यांच्याकडे ३ लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती.
ही लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी सासवडे यांच्याविरुद्ध मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा करताना, अजितकुमार यांनी १५ लाख रुपयांची लाच घेण्याचे मान्य केले होते. त्यानंतर बुधवारी तक्रारदार १५ लाख रुपये घेऊन संबंधित कार्यालयात आले होते. यावेळी त्यांच्याकडून लाचेची रक्कम घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. प्रादेशिक उपायुक्तांना १५ लाख रुपयांच्या लाचप्रकरणी अटक झाल्याने तेथे उपस्थित अधिकारी आणि कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली होती.