२३ ऑक्टोबर/राजापूर : तालुक्यातील बारसू परिसरातील प्रस्तावित ग्रीन रिफायनरी प्रकल्पाच्या जागेत असलेल्या कातळशिल्पांसह रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व कातळशिल्पांचे केंद्र शासनाच्या निकष आणि नियमांप्रमाणे संवर्धन केले जाणार आहे. बारसू प्रकल्पस्थळातील काही जागेत कातळशिल्पे असल्याने आता ती वगळून आणखी काही जागा या प्रकल्पासाठी संपादित करून हा प्रकल्प मार्गी लावला जाणार असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पालकमंत्री श्री. सामंत काल राजापूर दौर्यावर होते. माती परीक्षण अहवाल अद्यापही प्राप्त झालेला नाही. मात्र तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर खर्या अर्थाने या प्रकल्पाच्या अंमलबजावणीला वेग येईल. मात्र रिफायनरी होणारच असा दावाही त्यांनी केला.
ते म्हणाले, सध्या बारसूमध्ये प्रकल्पासाठी जी जागा ठरविण्यात आली आहे, त्यातील काही भागात कातळशिल्पे आढळून आली आहेत. मात्र या सर्व कातळशिल्पांचे आणि रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्या -ज्या ठिकाणी कातळशिल्पे आहेत, ती केंद्र शासनाच्या नियम व निकषाप्रमाणे संरक्षित केली जाणार आहेत. बारसू व परिसरात प्रकल्प राबविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जमीन मालकांची संमती पत्रे आली आहेत व येत आहेत. प्रस्तावित काही जागेत कातळशिल्पे आढळून आल्याने वाढीव जमीन आवश्यक आहे. ती उपलब्ध करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू असून काहींनी संमतीही दिली आहे. त्यामुळे प्रकल्पासाठी आवश्यक ती सर्व जागा या ठिकाणी उपलब्ध आहे.