मुरबाडमधून विक्रमी मताधिक्याचा,…महायुतीच्या नेत्यांचा निश्चय…कपिल पाटील, किसन कथोरे, हिंदुराव, सुभाष पवारांची उपस्थिती…

Spread the love

मुरबाड, दि. १३ (प्रतिनिधी/लक्ष्मण पवार) – आगामी लोकसभा निवडणुकीत मुरबाड विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार कपिल मोरेश्वर पाटील यांना विक्रमी मताधिक्य मिळवून देण्याचा निश्चय महायुतीच्या मेळाव्यात शुक्रवारी करण्यात आला. केंद्रीय राज्यमंत्री व महायुतीचे उमेदवार कपिल पाटील, भाजपाचे आमदार किसन कथोरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रमोद हिंदुराव, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख सुभाष गोटीराम पवार यांच्यासह मनसे व रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा भव्य मेळावा मुरबाड येथे उत्साहात पार पडला. या मेळाव्यात भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील, भाजपाचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, आमदार किसन कथोरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रमोद हिंदुराव, कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील, माजी आमदार कृष्णकांत तेलम, शिवसेनेचे भिवंडी लोकसभा सहसंपर्कप्रमुख सुभाष पवार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष मधुकर मोहपे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष भरत गोंधळी, सुभाष घरत, उल्हास बांगर, भगवान भालेराव, नगराध्यक्ष मुकेश विशे, माजी नगराध्यक्ष किसन अनंत कथोरे, भाजपाचे तालुकाध्यक्ष जयवंत सुर्यराव, शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रकाश पवार, मनसेचे तालुकाध्यक्ष आशिष रत्नाकर, वैशाली घरत, महेश जाधव, लियाकत शेख, देवेन जाधव, दीपक खाटेघरे, प्रतिक हिंदुराव, हरेश खापरे आदींसह हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मुरबाड तालुक्यातील नागरिकांचे अनेक दशकांपासून रखडलेले मुरबाड रेल्वेचे स्वप्न पूर्ण झाले. केंद्रीय अर्थसंकल्पात मुरबाड रेल्वेमार्गासाठी तरतूद झाली असून, मुरबाड रेल्वेमध्ये जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांना जादा नुकसानभरपाई मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. कल्याण-मुरबाड रेल्वे १०० टक्के होणार असल्याचे छातीठोकपणे सांगत असून, कल्याण-मुरबाड रस्त्याचे काम वेगाने सुरू आहे. बदलापूरपर्यंत मेट्रो निश्चितपणे येईल, अशी ग्वाही महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी दिली. तर मुरबाड-शहापूर रस्त्याला अनेक वर्षांपूर्वी मंजुरी मिळाल्यानंतरही कंत्राटदारामुळे तेथील काम पूर्ण झालेले नाही, याकडे श्री. कपिल पाटील यांनी लक्ष वेधले. मुरबाड विधानसभा मतदारसंघाचा समावेश `एमएमआरडीए’ क्षेत्रात करण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. मुरबाड विधानसभा मतदारसंघात विक्रमी मताधिक्य देण्याची क्षमता असल्याचे श्री. कपिल पाटील यांनी आवर्जून नमूद केले.

मुरबाड विधानसभा मतदारसंघात दहा वर्षांत अनेक विकासकामे झाली. अनेक रस्त्यांची कामे पूर्ण झाली. रस्ते व अन्य विकासकामांसाठी सर्वाधिक निधी मुरबाड मतदारसंघाला मिळाला. या विकासकामांमुळे भाजपासह महायुतीला मतदारांची पसंती मिळाली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मला मिळालेल्या मताधिक्यापेक्षा अधिक मताधिक्य मिळविण्यासाठी भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता मेहनत घेईल. महायुतीच्या माध्यमातून भिवंडी लोकसभा मतदारसंघात विक्रमी मताधिक्याची नोंद होईल, असा विश्वास आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केला.
या वेळी ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रमोद हिंदुराव, कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार आदींसह महायुतीच्या नेत्यांची भाषणे झाली.

मुरबाड तालुक्याची राजकीय ताकद एकाच व्यासपीठावर!

मुरबाड तालुक्यात स्थानिक पातळीवर भाजपाचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील व आमदार किसन कथोरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमोद हिंदुराव, शिवसेनेचे सुभाष पवार यांची राजकीय ताकद मोठी आहे. मनसे व रिपब्लिकन पक्षाचेही मोठ्या प्रमाणावर समर्थक आहेत. महायुतीच्या आजच्या मेळाव्यात ही ताकद एकाच व्यासपीठावर पाहावयास मिळाली. यापूर्वीच्या स्थानिक निवडणुकीत आपण एकमेकांविरोधात लढलो असलो, तरी आगामी लोकसभा निवडणुकीत कपिल पाटील यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख सुभाष पवार यांनी व्यक्त केला…

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page