
चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण नगर परिषद, लोकमान्य टिळक वाचनालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “वाचू आनंदाने” या वाचनप्रवृत्ती वाढविणाऱ्या उपक्रमाचे आयोजन आज रविवारी वाचनालयात उत्साहात पार पडले.
या अभिनव उपक्रमाला चिपळूणकर नागरिकांकडून दर रविवारी चांगला प्रतिसाद लाभत आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सध्या हा उपक्रम वाचनालयाच्या आवारातच राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर यांनी दिली.
कार्यक्रमादरम्यान चिपळूणच्या साहित्य, सांस्कृतिक, कला आणि क्रीडा क्षेत्रातील मार्गदर्शक प्रकाश देशपांडे यांचा “मोगऱ्याचे फूल” देऊन सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी ॲक्टीव्ह ग्रुपचे कैसर देसाई, नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे प्रतिनिधी सुनिल खेडेकर, वाचनालय व नगर परिषदेचे कर्मचारी आणि वाचनप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.