
नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात आरसीबीनं विजय मिळवला आहे.
अहमदाबाद IPL Winner 2025 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची 17 वर्षांची प्रतीक्षा संपली आहे. गेल्या 17 वर्षांपासून अनेक वेळा पराभव आणि थट्टेचा सामना करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं अखेर पहिल्यांदा इंडियन प्रीमियर लीगचं विजेतेपद पटकावलं आहे. रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील बंगळुरुनं रोमांचक अंतिम सामन्यात पंजाब किंग्जचा 6 धावांनी पराभव केला. यासह, संघ आयपीएल 2025 चा विजेता बनला. कृणाल पांड्या, यश दयाल आणि भुवनेश्वर कुमार यांच्या संस्मरणीय स्पेलच्या बळावर, बंगळुरुनं 190 धावांचा स्कोअर यशस्वीरित्या राखला आणि 6 धावांनी सामना जिंकला.
आरसीबीच्या फलंदाजांना मोठी खेळी करण्यात अपयश : या सामन्यात पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरनं नाणेफेक जिंकत आरसीबीला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं. यानंतर फलंदाजीला आलेल्या बेंगळुरुला डावाच्या दुसऱ्याच षटकात फिल सॉल्टच्या (16) रूपानं पहिला धक्का बसला. मात्र यानंतर विराट कोहली (43), मयंक अग्रवाल (24), रजत पाटीदार (26), जितेश शर्मा (24) आणि लियम लिविंगस्टोन (25) यांनी केलेल्या उपयुक्त खेळीमुळं रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुनं निर्धारित 20 षटकात 9 बाद 190 धावा उभारल्या. आरसीबीच्या सर्व फलंदाजांना चांगली सुरुवात मिळाली, मात्र एकही फलंदाज त्या खेळीचं मोठ्या खेळीत रुपांतर करू शकला नाही. पंजाबकडून आर्शदीप सिंह आणि काईल जेमींसन यांनी प्रत्येकी तीन तर विजयकुमार वेशक, यजुवेंद्र चहल आणि आजमतुल्ला उमरजाई यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
कृणालची चांगली गोलंदाजी : कृणाल पांड्यानं अंतिम सामन्यात 4 षटकांत 2 विकेट्स घेत फक्त 17 धावा दिल्या, ज्यामुळं या अंतिम सामन्यात सर्वात मोठा फरक पडला. कृणाल व्यतिरिक्त, भुवनेश्वर कुमारनंही आरसीबीसाठी 2 विकेट्स घेतल्या, जे त्याच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच टी-20 सामन्याच्या अंतिम सामन्यात विकेट घेण्यास यशस्वी झाला.
पंजाबनं गमावल्या ठराविक अंतरानं विकेट :आरसीबीनं दिलेल्या 191 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या पंजाबला सलामीवीर प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्या यांनी 5 षटकांत 43 धावांची सलामी दिली. मात्र पाचव्या षटकात फिल साल्टनं अफलातून झेल घेतल्यानं प्रियांश आर्य 24 धावांवर बाद झाला आणि ही भागीदारी तुटली. यानंतर प्रभसिमरन सिंग (26), जोश इंग्लिश (39), श्रेयस अय्यर (1), निहाल वढेरा (15) हे लागोपाठ अंतरात बाद झाले. परिणामी संघाला पहिल्या जेतेपदापासून वंचित राहावं लागलं.