आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यात आरसीबीनं 27 धावांनी विजय मिळविला. या विजयानंतर आरसीबीनं आयपीएलच्या प्लॅऑफमध्ये प्रवेश मिळविला.
*बंगळुरु –* इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 17 व्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यातील 68वा सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगला. वेगवान गोलंदाज यश दयालनं 2 विकेट आणि 42 धावा करून आरसीबीच्या गळ्यात विजयाची माळ घातली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यानं धोनीला शेवटच्या षटकात बाद करून सीएसकेच्या विजयाचं स्वप्न उद्धवस्त केलं.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं ( RCB) इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) प्लेऑफमध्ये प्रवेश केला. चेन्नई सुपर किंग्जचा एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर 27 धावांनी पराभव झाल्यानं चाहत्यांची अत्यंत निराशा झाली. कर्णधार फाफ डु प्लेसिस (54), विराट कोहली (47), रजत पाटीदार (41), आणि कॅमेरून ग्रीन (नाबाद 38) यांनी तडाखेबंद फलंदाजी करत 218/5 ची आव्हानात्मक धावसंख्या उभारली. तर सीएसकेकडून रचिन रवींद्रनं 61 आणि रवींद्र जडेजा-एमएस धोनी यांनी 27 चेंडूत 61 धावांची भागीदारी केली होती. मात्र, आरसीबीच्या गोलंदाजीपुढे सीएसकेच्या फलंदाजांना शरणागती पत्करावी लागली.
हा दोन संघांमधील हा सामना बेंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झाला. या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर आरसीबीनं प्रथम फलंदाजी केली. कोलकाता नाइट रायडर्स (KKR), राजस्थान रॉयल्स (RR) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) आधीच प्लेऑफमध्ये पोहोचले आहेत. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीनं सीएसकेला विजयासाठी 219 धावांचं लक्ष्य दिलंय. प्रत्युत्तरात चेन्नईची सुरुवात खराब झाली. डावाच्या पहिल्याच चेंडूवर कर्णधार ऋतुराज गायकवाड शून्यावर बाद झाला. तसंच डेरिल मिचेलही स्वस्तात परतला. मात्र त्यानंतर अजिंक्य राहणे आणि रचिन रवींद्र यांनी आक्रमक फटके मारत डाव सावरला.
कर्नाटकचे मुख्यमंत्री हे आरसीबीच्या विजयानंतर खूश झाले. त्यांनी एक्स मीडियावर पोस्ट करत संघाचं कौतुक केलं. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले, “सलग सहाव्या विजयासह आपल्या आरसीबीनं प्लेऑफमध्ये प्रवेश केला. मी चिन्नास्वामी स्टेडियममध्ये उपस्थित असताना सामन्याच्या प्रत्येक क्षणाचा आनंद लुटला. आमच्या आरसीबी संघाच्या ऐतिहासिक विजयाच्या क्षणांचा साक्षीदार होताना आनंद झाला. आरसीबीसाठी हा एक नवीन टप्पा आहे.
*🔹️आरसीबीचा धावडोंगर-*
नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं आपल्या निर्धारित 20 षटकांत 5 गडी गमावून 218 धावा केल्या. कर्णधार फाफ डू प्लेसिसनं 54 धावांची खेळी केला. यात तीन चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. तसंच संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीनंही 29 चेंडूत 47 धावा केल्या. कोहलीनं यात तीन चौकार आणि चार षटकार मारले. कोहली आणि डु प्लेसिस यांच्यात पहिल्या विकेटसाठी 78 धावांची भागीदारी झाली. यामुळे मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. कोहली-डू प्लेसिसनंतर कॅमेरुन ग्रीन आणि रजत पाटीदारनं आक्रमक खेळ केला.
*🔹️प्लेऑफ गाठण्यासाठी काय परिस्थिती-*
शनिवारी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली होती. सुदैवानं सामाना सुरळित चालू राहिला. जर हा सामना झाला नसता तर चेन्नई सुपर किंग्ज प्लेऑफमध्ये पोहोचू शकला असता. RCB ला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी किमान 18 धावांनी सामना जिंकावा लागणार होता. सामना 27 धावांनी जिंकल्यानं आरसीबीनं सहजरित्या प्लेऑफमध्ये प्रवेश मिळविला. या विजयानंतर आरसीबीच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
*🔹️दोन्ही संघात मोठे बदल-*
या सामन्यासाठी दोन्ही संघात मोठे बदल करण्यात आले. चेन्नईनं किवी अष्टपैलू मिचेल सँटनरचा संघात समावेश केलाय. मायदेशी परतलेल्या मोईन अलीची जागा सँटनरनं घेतली. तर आरसीबीनं ग्लेन मॅक्सवेलचा प्लेइंग 11 मध्ये समावेश केलाय कारण इंग्लिश अष्टपैलू विल जॅक देखील मायदेशी परतलाय.
*🔹️हेड-टू-हेड रेकॉर्ड-*
इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात आतापर्यंत 32 सामने खेळले गेले आहेत. यात चेन्नई सुपर किंग्जनं 21 सामने जिंकले आहेत, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं 10 सामने जिंकले. एक सामना अनिर्णित राहिला. या मैदानावर सीएसकेनं फक्त एकच सामना गमावला आहे.
*🔸️दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन…*
*🔹️रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची प्लेइंग 11..*
फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), कर्ण शर्मा, यश दयाल, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद सिराज.
*🔹️चेन्नई सुपर किंग्जची प्लेइंग 11..*
रचिन रवींद्र, रुतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टीरक्षक), मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, सिमरजीत सिंग, महिश तिक्षीना.