रत्नागिरीचा सुपूत्र पखवाज वादन संगीत अलंकार परीक्षेत देशपातळीवर सर्वप्रथम…

Spread the love

*रत्नागिरी:* रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील आडिवरे गावचा सुपूत्र, प्रसिद्ध पखवाजवादक प्रथमेश तारळकर याने अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातर्फे घेण्यात आलेल्या पखवाज वादन संगीत अलंकार परीक्षेत देशपातळीवर सर्वप्रथम येण्याचा सन्मान प्राप्त केला आहे.

मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकॅडमी येथे दिनांक 18 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता प्रथमेशला संगीत अलंकार ही पदवी प्रदान करण्यात येणार आहे. याचबरोबर पं.गणेश आण्णा चौधरी पुरस्कारानेही सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी संगीत क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहे.

प्रथमेश हा रत्नागिरीतील एक संगीत रत्न आहे. त्याने आपल्या पखवाजवादनाने राज्यभरात नावलौकिक मिळवला आहे. आता त्याने देशपातळीवरही आपली ओळख निर्माण केली आहे. आपल्या वादनात उत्तम प्रगती करत प्रथमेशने राज्यभरातील विविध मान्यवर संगीत महोत्सवात पखवाज वादन केले आहे. तसेच नामवंत गायकांनाही संगीत साथ केली आहे. संगीत क्षेत्रातील प्रख्यात शास्त्रीय, उपशास्त्रीय नामवंत गायक पं. संजीव अभ्यंकर, पं. शौनका अभिषेकी, पं. आनंद भाटे, पं. रघुनंदन पणशीकर, तसेच विदुषी आरती अंकलीकर-टिकेकर, विदुषी देवकीताई पंडित, विदुषी मंजुषा पाटील यांना प्रथमेशने पखवाजसाथ केली आहे. यंदा शास्त्रीय संगीत विश्वातील जगविख्यात सवाई गंधर्व संगीत महोत्सवातही वादन केले आहे.

प्रथमेश वयाच्या 8 व्या वर्षांपासून पखवाज वादनाचे शिक्षण घेत आहे. प्रथमेशचे वडील श्री संजय तारळकर भजन करत असल्याने घरातूनच त्याला सांगितिक संस्कार मिळाले. गायकांना पखवाज साथसंगत करण्याबरोबर प्रथमेश आता एकल पखवाज वादनही करत आहे. त्याने मुंबईत पखवाज वादनाचे क्लासही सुरू केला आहे. त्याला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

प्रथमेशने गुरू श्री. परशुराम गुरव आणि तालयोगी पंडित सुरेशजी तळवलकर यांच्याकडे पखवाज वादनाचे धडे गिरविले आहेत. आपण हे यश गुरूंबरोबरच आई सौ. संध्या आणि वडिल संजय तारळकर आणि त्याच्या कायम पाठीशी असलेला मित्रपरिवार, शुभचिंतक यांच्या कृपाशीर्वादाने मिळविल्याचे प्रथमेशने सांगितले. हा पुरस्कार मिळणे माझ्यासाठी प्रेरणादायी असून यापुढेही आपली संगीत साधना, संगीत सेवा अशीच सुरू ठेवणार असल्याचे प्रथमेश याने यानिमित्ताने सांगितले.

🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page